पुणे : राज्यात कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. पुणे शहरात कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात असल्याने बेड वेळेवर उपलब्ध होत नाहीयेत. गुरुवारी न्यालयाने पुण्यासारख्या शहरात सरकारने लोकडाऊन लावावे असा सल्ला दिला आहे. यापार्श्वभूमीवर पुण्यात कडक लॉकडाऊन लागणार काय? याबाबत नागरिकांच्यात चर्चा सुरु होती. आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत माहिती दिली आहे. पुण्यात लॉकडाऊन लावण्यासारखी परिस्थिती नसल्याचे अधिकारी सांगत आहेत. मात्र, येथील निर्बंध अधिक कडक करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत असे पवार यांनी सांगितले आहे.
आज पुणे येथे शहरातील करोना रुग्णसंख्येचा आढावा घेणारी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. याबैठकीत शहरात कडक निर्बंध करावेत, जे लोक अनावश्यकपणे बाहेर फिरत आहेत, त्यांना रोखावं, अशी चर्चा झाली आहे. वाढत्या कोरोनामुळे पुणे जिल्ह्यात लॉकडाऊन लागणार का? असा प्रश्न पडला असताना उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी लॉकडाऊन लावण्यासारखी परिस्थिती नाही असे अधिकारी म्हणत असल्याचे सांगितले.
वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पुण्यातील स्थिती पाहता कडक लॉकडाऊनचा सरकारने विचार करावा, अशा सूचना मुंबई हायकोर्टाने दिल्या होत्या. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या माहितीनंतर सध्या तरी शासनाने संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय घेणं टाळलं आहे. पुणे येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडल्यानंतर उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, ‘ग्रामीण भागात रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र पुणे शहरात रुग्णसंख्या वाढलेली नाही, काही प्रमाणात ही संख्या कमी झाली आहे. बैठकीत आमदार-खासदारांनी काही सूचना केल्या. दुसऱ्या टप्प्यात रेमडेसिवीर, ऑक्सिजन, बेड, व्हेंटिलेटरसाठी जी धावपळ करावी लागली ती तिसऱ्या लाटेत करायला लागू नये, यासाठी बैठकीत चर्चा झाली,’ असल्याची माहिती पवार यांनी दिली.