उद्धव ठाकरेंना पुन्हा NDA मध्ये घेणार का?? फडणवीसांचे मोठं विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाचे रूपच बदललं. विधानसभा निकालानंतर उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) भाजपसोबत युती तोडून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सोबत महाविकास आघाडी स्थापन केली आणि ते मुख्यमंत्री बनले. त्यानंतर अडीच वर्षांनी एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह पक्षातून बंड करत भाजपसोबत सत्तास्थापन केली आणि ठाकरे सरकार कोसळले. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदेंना शिवसेना नाव आणि चिन्ह दिले. आता राज्यात ठाकरे गट हा भाजप आणि एकनाथ शिंदे यांचा कट्टर विरोधक झाला आहे. परंतु ज्याप्रमाणे बिहारमध्ये नितीशकुमार पुन्हा एकदा भाजपसोबत गेले त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे हे सुद्धा पुन्हा एकदा भाजपसोबत आले तर त्यांना NDA मध्ये घेणार का?? असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना केलं असता त्यांनी महत्वाचे उत्तर दिले आहे.

लोकमतला दिलेल्या एका मुलाखतीत फडणवीसांनी म्हंटल, उद्धव ठाकरेंनी आमच्यासाठी दारं बंद केली आहेत. केवळ दारं बंद केली नाहीत तर आमची मनं दुरावली आहेत त्यामुळे उद्धव ठाकरे आमच्याबरोबर येण्याची कुठलीही शक्यता नाही. राजकारणात प्रत्येक व्यक्तीचं आणि पक्षाचं राजकीय धोरण असतं. तुमचं आणि माझं धोरण वेगळं असू शकतं. अनेकवेळा एखाद्या गोष्टीवर राजकीय मतभेद होतात. ते मतभेद दूर करून एकत्र येणं शक्य असतं. परंतु, इथे मात्र परिस्थिती तशी नाही. उद्धव ठाकरे ज्या प्रकारे खालच्या स्तरावर जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करतात, या सगळ्या गोष्टींनी आमची मनं दुखावली गेली आहेत. जिथे मनं दुखावतात तिथे युती होत नाही. राजकीय मतभेद असतील तर ते दूर करून युती होते. परंतु, जिथे मनं दुरावलेली असतात, तिथे एकत्र येणं कठीण असतं असं म्हणत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंसोबत युतीशी शक्यता पूर्णपणे फेटाळली आहे.

मनसे महायुतीत सामील होणार का?

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आणि मसनेच्या (BJP – Manse) संभाव्य युतीवर सुद्धा भाष्य केलं. राज ठाकरे यांच्याशी आमची निश्चितपणे मैत्री आहे. अधून-मधून आमच्या भेटीगाठी होतात. अनेक विषयांवर गप्पा होतात . अनेकदा राज ठाकरे सरकारला चांगल्या सूचना करतात. कधीकधी आमच्यावर टीकाही करतात. परंतु, आम्ही एकत्र येऊन काम करू की नाही हे आत्ता सांगू शकत नाही. त्यामुळे येत्या काही काळात मनसे कोणासोबत असेल ते वेळच सांगेल असं फडणवीस यांनी म्हंटल.