कॉमेंट्रीची संधी पुन्हा द्या, तुमच्या नियमांप्रमाणे काम करेल! संजय मांजरेकरची बीसीसीआयला विनंती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । काही महिन्यांपूर्वी भारतीय संघाच्या कामगिरीबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे बीसीसीआयने मांजरेकरांना आपल्या कॉमेंट्री पॅनलमधून हटवलं होतं. बीसीसीआयने याबद्दल अधिकृत घोषणा केलेली नसली तरीही बीसीसीआयमधील काही अधिकारी हे मांजरेकरांवर नाराज असल्याचं समोर आलं होतं. बीसीसीआय सध्या आयपीएलच्या तेराव्या हंगामाच्या तयारीत आहे. १९ सप्टेंबर ते ८ नोव्हेंबर दरम्यान ही स्पर्धा युएईमध्ये खेळवली जाणार आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार आयपीएलमध्ये समालोचन करण्याची संधी मिळावी यासाठी मांजरेकर यांनी बीसीसीआयला इ-मेल द्वारे विनंती केल्याचं समजतंय.

“बीसीसीआयच्या वरिष्ठ कार्यकारणीतील सदस्यांना माझा नमस्कार, आशा आहे तुम्ही सर्व ठीक असाल. समालोचक म्हणून माझी बाजू मांडणारा इ-मेल मी तुम्हाला याआधी पाठवला आहे. आयपीएलच्या तारखा जाहीर झाल्या आहेत, त्यामुळे बीसीसीआय लवकरच आपलं कॉमेंट्री पॅनल अंतिम करणार आहे. मी तुम्ही आखून दिलेल्या नियमांप्रमाणे काम करायला तयार आहे. कितीही झालं तरीही आपण सर्व एकाच गोष्टीसाठी काम करत आहोत.” मांजरेकर यांनी आपल्या इ-मेलमध्ये बीसीसीआयला अशी विनंती केल्याचं समजतंय.

टाइम्स ऑफ इंडियानेच दिलेल्या वृत्तानुसार भारताचे माजी कर्णधार आणि क्रिकेटपटू सुनील गावसकर आयपीएलमध्ये समालोचनासाठी युएईला जाणार आहेत. त्यामुळे मांजरेकरांच्या विनंतीवर बीसीसीआय काय निर्णय घेतंय याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यादरम्यानही मांजरेकर यांनी प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले यांना उद्देशून अपमानजनक वक्तव्य केलं होतं. ज्यानंतर सोशल मीडियावर मांजरेकरांविरोधात नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, मार्च महिन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर ३ वन-डे सामन्यांची मालिका खेळण्यासाठी आला होता. या मालिकेसाठी कॉमेंट्री पॅनलमध्ये मांजरेकर यांची निवड करण्यात आलेली नव्हती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”