आजन्म अहिंसेची शिकवण देणाऱ्या बापूंनी महिलांना दिला होता आत्मसंरक्षणासाठी वाट्टेल ते करण्याचा संदेश

हॅलो महाराष्ट्रात । वर्तमानात देशात महिलांवरील अत्याचारात वाढ होऊन हा समाजच स्त्रियांचा भक्षक बनला आहे असं चित्र आहे. उत्तर प्रदेशमध्ये मागील दोन दिवसांत तीन मुलींवर बलात्कार झाले आहेत. राजस्थानमध्येही अशीच घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील हाथरस पीडितेला मरणानंतरही सन्मानपूर्वक वागणूक मिळाली नाही. दर दिवशी बलात्कारानंतर हत्येच्या अंगावर काटा आणणाऱ्या घटना देशाच्या कुठल्यानं कुठल्या कोपऱ्यातून कानी पडत आहेत. या संपूर्ण कोलाहलात बापू म्हणजेच महात्मा गांधींचे महिलांविरोधातील अत्याचार थांबवण्यासाठी त्यांचे विचार देशाला मार्गदर्शक ठरतात.

आयुष्यभर अहिंसेची शिकवण देणारे बापू महिलांना मात्र, आत्मसंरक्षणासाठी जे करता येईल ते करा! असा संदेश देतात तेव्हा महिलांविरोधातील अत्याचार, गुन्ह्यांवर गांधी यांचे विचार किती स्पष्ट होते हे दिसून येते. मुलांना त्यांनी या संदर्भात एक पत्र लिहिले होते. यामध्ये त्यांनी महिलांनी आत्मसंरक्षणासाठी जे काही करावे लागेल ते करावे, असा सल्ला दिला होता. बलात्कार झालेल्या स्त्रीचा कोणत्याही प्रकारे तिरस्कार केला जाऊ नये असे त्यांचे मत होते. तसेच त्यांनी आपल्या मुलांनाही महिलांसोबत आदरपूर्वक वागण्याची सक्त ताकीद दिली होती. आपल्या मर्यादांचे उल्लंघन करू नये, असेही त्यांनी म्हटले होते.

‘द माइंड ऑफ महात्‍मा गांधी’ पुस्तकात वाईट प्रवृत्ती आणि महिलांवरील अत्याचारावर गांधींचे विचार मांडण्यात आले आहेत. यानुसार गांधींनी म्हटले आहे की, जर महिला हल्लेखोराच्या शारीरिक ताकदीला प्रतिकार करू शकत नसेल तर तिचे पावित्र्यच तिची ताकद बनेल. सीतेचे उदाहरण घ्या. शारीरिक दृष्ट्या सीता रावणासमोर शक्तीहीन होती. मात्र, तिची पवित्रता रावणाच्या ताकदीपेक्षा जास्त शक्तीशाली होती. अनेक प्रलोभने देऊन रावणाने सीतेचे मन जिंकण्याचा प्रयत्न केला. मात्र, सीतेला तो हातही लावू शकला नाही. माझ्या मतानुसार निडर महिला हे जाणते की तिचे पावित्र्यच तिची सर्वात मोठी ढाल आहे. मनुष्यच नाही तर अग्नीही तिच्यासमोर लाजेल, असे गांधी यांनी म्हटले आहे.

महिलेच्या प्रश्नांना गांधींचे खुले उत्तर
एका महिलेने बापुजींना महिलांवरील अत्याचाराबाबत काही प्रश्न विचारले होते. यावर त्यांनी दिलेले उत्तर खरेच विचार करायला लावणारे आहे. गांधींनी 1942 मध्ये ‘हरिजनबंधु’ नावाच्या गुजराती नियतकालीकेमध्ये हे उत्तर दिले होते. ”ज्या महिलेवर बलात्काराचा प्रसंग ओढवला ती तिरस्काराच्या नाही तर दयेची पात्र आहे. ती स्री जखमी झालेली असते, यामुळे ज्याप्रकारे आपण जखमींची सेवा करते तशीच सेवा तिची केली पाहिजे. शील भंग कोणाचे होते? जी स्त्री शारिरीक संबंधांना तयार होते तिचे. बलात्कार झालेली स्त्री त्या नराधमाला विरोध करते. यामुळे शील भंग हा शब्द बदनामी करतो. यामुळे बलात्कार हा योग्य शब्द त्या स्त्रीबाबत वापरला जावा, असेही गांधी म्हणाले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like