गुजरातमधून आलेली सांगलीतील महिला कोरोना पॉझिटिव्ह

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

खानापूर तालुक्यातील साळशिंगे येथे गुजरातमधील अहमदाबाद मधून आलेली एक 30 वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे रविवारी वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले. मात्र त्या महिलेच्या पतीची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. वाळवा तालुक्यातील कामेरी येथील 94 वर्षीय कोरोनाबधित आजीने 14 दिवसांच्या औषधोपचारानंतर कोरोनाची पहिली चाचणी निगेटिव्ह आली असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी सांगितले.

कासेगाव, कामेरीतील 25 जणांना रविवारी घरी सोडण्यात आले. जिल्ह्यातील सद्यस्थितीत कोरुना रुग्णांची संख्या नऊवर पोहोचली. शासनाने परराज्यात अथवा बाहेरील जिल्ह्यात अडकलेल्या नागरिकांना आपल्या गावी जाण्याची परवानगी दिली आहे सांगली जिल्ह्यात परराज्यातूनही अनेक नागरिक येत आहेत त्यांची तपासणी करून होम क्वॉरंटाईन केले जात आहे. खानापूर तालुक्यातील साळशिंगे येथे गुजरात मधून पती-पत्नी आली होती. त्या दोघांना गावामध्ये होम क्वारंटाईन केले होते.

त्यानंतर ते दोघे परराज्यातून आले असल्याने त्यांची विटा येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक तपासणी करण्यात आली. तीस वर्षीय महिलांमध्ये कोरोना बाबतची काही लक्षणे ग्रामीण रुग्णालयात आढळली. त्यामुळे महिला आणि तिच्या पतीला मिरज येथील कोविड रुग्णालयात दाखल केले. तेथे कोरोना तपासणीसाठी त्या दोघांचे स्वब घेण्यात आले होते. कोरोना तपासणीचा अहवाल संध्याकाळी आला असून ती महिला पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. मात्र त्या महिलेचा पतीची चाचणी निगेटिव्ह आली आहे. साळशिंगे बाहेरून आलेल्या महिलेला कोरोना असल्याचे स्पष्ट झाल्याने गावामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

प्रशासनाने तात्काळ खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण गाव केले आहे. त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध आरोग्य विभागाकडून घेतला जात असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. साळुंखे यांनी सांगितले. कामेरी आणि कासेगावमधील काही व्यक्तींना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. कामेरीतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या कुटुंबातील 94 वर्षीय आजीचा अहवाल पॉझिटिव्ह आली होती. त्या आजीला मिरजेतील आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 14 दिवसांच्या औषधोपचारानंतर आजीची कोरोनाची पहिली चाचणी घेण्यात आली होती, त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला असल्याने आजीने कोरोनावर मात केल्याचे स्पष्ट झाले. कासेगाव आणि कामेरीतील कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या पंचवीस जणांचा अहवाल ही निगेटिव्ह आला होता, त्यांनाही रविवारी घरी सोडण्यात आले.

Leave a Comment