सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे ,
शिराळा तालुक्यातील कांदे गावामध्ये महाराष्ट्र दिनीच महिला सरपंचाला मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सरपंच सुवर्णा बाळासाहेब पाटील यांना कामगार दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ग्रामसभेत मारहाण करण्यात आली. या प्रकरणी सुवर्णा पाटील यांनी शिराळा पोलीस ठाण्यात चौघांविरोधात फिर्याद दिली असून फिर्यादीनुसार चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान ग्रामसभेतच महिला सरपंचाला मारहाणीची घटना घडल्यामुळे गावामध्ये एकाच खळबळ उडाली आहे.
१ मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त कांदे येथील जोतिर्लिंग देवाच्या मंदिरामध्ये ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या ग्रामसभेमध्ये विविध विषयांवर वाचन चालू असतानाच गावातील निशिकांत गोळे यांनी घंटा गाडीचा विषय मांडला. यावर सरपंच सुवर्णा पाटील यांनी ग्रामपंचायतिला घंटा गाडी बाबत येणाऱ्या अडचणी समजून सांगत असतानाच विक्रम पाटील यांनी वादावादी घालायला सुरवात केली. तू गेली एक वर्ष झाले तरी गाडी अनु शकत नाहीस असे म्हणून महिला सरपंचाशी वाद घालण्यास सुरवात केली. वाद वाढतच गेल्याने पाटील यांनी हातातील माईक काढून घेत सरपंच सुवर्णा पाटील यांना धक्काबुकी करत मारहाण केली. तर सागर पाटील, रणजित पाटील यांनी झटापट करत गळ्यातील मणिमंगळ सूत्र तोडले. शिवाय संपत पाटील, विश्वास पाटील. धनाजी पाटील यांनी सुवर्णा पाटील व पती बाळासो पाटील याना धक्का बुकी करत. जीवे मारण्याची धमकी दिली.
सरपंच सुवर्ण पाटील यांनी शिराळा पोलिसात फिर्याद दिली आहे. दिलेल्या फिर्यादीवरून चौघाजणांवर शिराळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या ग्रामसभेमध्ये ग्रामस्थ असूनही कोणीही वाद मिटवण्यास मध्यस्ती केली नाही. मात्र महिला सरपंचाला मारहाणीचा प्रकार घडल्याने गावामध्ये एकच खळबळ उडाली. दोन गटातील वादातूनच मारहाण झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.