अहमदनगर प्रतिनिधी | जिल्हयातील ‘सैराट’ प्रकरणाची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली आहे.मुलगी-जावयाला पेटविल्या प्रकरणात आपण व्यक्तीशः लक्ष घालून उचित कार्यवाही करावी असे पत्र महिला आयोगाने अहमदनगरच्या पोलीस अधीक्षकांना पाठविले आहे. तसेच कार्यवाहीचा अहवाल देखील महिला आयोगाने मागविला आहे.
अहमदनगर जिल्हयातील पारनेर तालुक्यातील निघोज येथे आंतरजातीय विवाह केल्याने नाराज झालेल्या मुलीच्या घरच्यांनी मुलीला आणि जावयाला पेटवून दिल्याची घटना घडली आहे.यात मुलीचा मृत्यू झाला असून मुलावर पुण्यातील ससून रूग्णालयात उपचार सुरू आहेत.पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून मुलीचे काका आणि मामा यांना अटक करण्यात आली आहे. तिचे वडील फरार आहेत.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.अहमदनगरच्या पोलीस अधिक्षकांनी या प्रकरणात व्यक्तीशः लक्ष घालावे.समाजात दहशत निर्माण करणा-या या कृत्याप्रकरणी तातडीने कारवाई होणे गरजेचे आहे.त्यामुळे अधिक्षकांनी या प्रकरणी काय कारवाई केली याचा अहवालही महिला आयोगाने मागविला आहे.