रयत शिक्षण संस्थेच्या जन्मगावी शाळेच्या नवीन इमारतीचे काम प्रगतीपथावर : अजून 75 लाखांच्या निधीची प्रतिक्षा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | कर्मवीर भाऊराव पाटील यांनी एक स्वप्न पाहिले होते की गोरगरिबांच्या, बहुजनांच्या मुलांना व इतर समाजातील प्रत्येक मुलांना चांगले शिक्षण मिळावे. यासाठी कर्मवीर आण्णांनी कराड तालुक्यातील काले येथील ग्रामस्थांना बरोबर घेऊन 4 आक्टोंबर 1919 साली काले गावात रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. याच रयतच्या विद्यालयाच्या नूतन इमारतीचे बांधकाम सुरू असून आज विद्यालयाचे बांधकाम प्रगतीकडे आहे.

काले ग्रामस्थांनी 3 वर्षांपूर्वी खा. राजू शेट्टी यांच्यासोबत रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खा. शरद पवार यांना भेटून शाळेसाठी निधीची मागणी केली होती. काले ग्रामस्थ व राजू शेट्टी यांची मागणी मान्य करत शरद पवार यांनी राष्ट्रवादी वेल्फेअर फंडातून 1 कोटी रूपये देण्यात आले. तसेच संस्थेच्या वतीने 50 लाख रूपये देण्यात आले. दरम्यान, खुद्द शरद पवार यांनी काले ग्रामस्थांना 20 लाख रुपये ग्रामस्थांनी देणगी जमा करा असं सांगितले. तसा शब्द ही ग्रामस्थांनी पाळत आज रोजी 25 लाख 50 हजार रुपये देणगी स्वरुपात जमा केली आहे.

इमारतीचे प्रस्तावित बांधकाम 1 कोटी 70 लाख रुपयांचे होते. त्यामध्ये 12 वर्गखोल्या व विद्यार्थ्यांच्यासाठी स्वच्छतागृहे असा प्लॅन होता. परंतु भविष्याचा विचार करता विद्यार्थी संख्या लक्षात घेता, अजून वर्गखोल्यांची गरज ओळखून रयत शिक्षण संस्थेने विद्यालयाच्या वाढीव कामासाठी मंजुरी दिली. त्यानुसार सुधारीत प्लॅन वाढवला असून नूतन इमारतीच्या बांधकामासाठी अजून 75 लाख रुपयांची गरज असून महाराष्ट्रातील रयत प्रेमी व दानशूर व्यक्तींनी रयत शिक्षण संस्थेच्या जन्मगावी सुरू असलेल्या विद्यालयाच्या नूतन इमारतीच्या बांधकामासाठी मदत करावी, असे आवाहन महात्मा गांधी विद्यालय माजी विद्यार्थी सेवा संघ काले यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Comment