कोरोना विषाणूनंतरचं जग – युवाल नोआ हरारी 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अवघ्या जगाला उत्क्रांतीचा अभ्यास पुन्हा रंजकतेने करायला लावणाऱ्या युवाल नोआ हरारी यांनी कोरोनाकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन मांडला आहे. प्रत्येक संकट हे संधी घेऊन येतं, ही संधी आहे जागतिक संकटाला सामोरं जाताना एकत्र यायची आणि मानवजातीला आवश्यक गोष्टींची मुक्तपणे एकमेकांसोबत देवाणघेवाण करण्याची. यासंदर्भातील हा लेख प्रत्येकाने वाचायलाच हवा.

लढा कोरोनाशी | कोरोनाचे हे संकट निघून जाईल. पण ज्या गोष्टींची निवड आपण करतो आहोत आणि ज्या संकटांचा सामना आपण गेले करीत आहोत त्यामुळे येणाऱ्या काही वर्षात मानवजातीचे आयुष्य बदलून जाणार आहे. कदाचित हे आपल्या पिढीचे सर्वात मोठे संकट आहे. पुढच्या काही आठवड्यात सरकार आणि लोक जे निर्णय घेतील, कदाचित तेच पुढच्या काही वर्षांसाठी जगाला आकार देतील. ते केवळ आपल्या आरोग्य सुविधेलाच नाही  तर आपल्या अर्थकारण, राजकारण आणि संस्कृतीला देखील आकार देतील. आपण फक्त वेगाने आणि निर्णायकपणे कृती केली पाहिजे. तसेच आपल्या कृतींचा दीर्घकालीन परिणामसुद्धा विचारात घेतला पाहिजे. अनेक पर्यायांमधील एक पर्याय निवडत असताना केवळ धोक्यावर पटकन मात कशी करायची यासोबत आपण स्वतःलाच विचारले पाहिजे, हे वादळ संपल्यानंतर आपण कोणते जीवन जगू? होय हे वादळ संपेल, मानवजात अस्तित्वात राहील आपल्यापैकी बरेच जण जिवंत असतील, पण आपण सगळे एका वेगळ्या जगात राहू. अनेक अल्प-मुदतीचे उपाय हे आपल्या जगण्याचे एक साधन बनतील. हे आणीबाणीचे स्वरूप आहे. जे ऐतिहासिक प्रक्रिया जलदरित्या पुढे पाठवतात. सामान्य वेळेतले निर्णय घेण्यासाठी, विचार विनिमय करण्यासाठी काही वर्षे लागू शकतात. तर त्याच्या अंमलबजावणीसाठी केवळ काही तास. अपरिपक्व आणि अगदी धोकादायक तंत्रज्ञानही अशावेळी सेवेत ढकलले जातात. कारण काहीच न करण्याची जोखीम खूप मोठी असते. सगळे देश मोठ्या प्रमाणातील एका सामाजिक प्रयोगातील गिनीपिग म्हणून काम करतात. जेव्हा प्रत्येक जण घरातून काम करतो आणि अंतरावरून संवाद साधतो तेव्हा काय होते? जेव्हा सगळ्या शाळा आणि विद्यापीठे ऑनलाईन होतात तेव्हा काय होते? सामान्य काळात सरकारे, व्यवसाय आणि शैक्षणिक मंडळे अशा गोष्टी करण्यास सहमती दर्शवत नाहीत. पण या सामान्य वेळा नाहीत. या संकटाच्या काळात आपल्यासमोर दोन महत्वाचे पर्याय आहेत. एक राज्यकारभारावर एकपक्षीय पाळत ठेवणे आणि नागरिकांचे सबलीकरण. आणि दुसरे राष्ट्रीय विलग राहणे आणि जागतिक एकता ठेवणे. 

त्वचेखाली लक्ष ठेवणे – साथीचे रोग थांबविण्यासाठी सगळ्या लोकसंख्येने काही मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे आवश्यक आहे. हे साध्य करण्याचे दोन मुख्य मार्ग आहेत. एक पद्धत सरकारसाठी आहे की, नियम मोडणाऱ्यांना शिक्षा करणे. आज, इतिहासात पहिल्यांदा असे घडले आहे कि, एकावेळी प्रत्येकाचे निरीक्षण करणे शक्य होते. पन्नास वर्षापूर्वी केजीबी (सोविएत रशियाची सुरक्षा यंत्रणा) सोविएतच्या नागरिकांचे निरीक्षण करू शकत नव्हता की, केजीबीने एकत्रित केलेल्या माहितीवर प्रक्रिया करू शकत होता. केजीबी मानवी एजंट आणि विश्लेषकांवर विसंबून होता आणि प्रत्येक नागरिकांचे अनुसरण करण्यासाठी मानवी एजंट ठेवता येऊ शकत नव्हता. पण आता मनुष्यदेहाच्या रक्ताच्या ठिपक्याच्या ऐवजी सरकार सर्वव्यापक सेन्सर आणि शक्तिशाली अल्गोरिदमवर अवलंबून राहू शकतात. कोरोना विषाणूच्या या साथीच्या रोगाविरुद्धच्या लढाईत सरकारने देखरेखीसाठी आधीच काही साधने तैनात केली आहेत. यात सगळ्यात उल्लेखनीय चीन आहे. लोकांच्या स्मार्टफोनचे बारकाईने निरीक्षण करून, त्यांच्या कॅमेऱ्याचा वापर कोट्यवधी लोकांचे चेहरे ओळखून, लोकांना त्यांच्या शरीराचे तापमान, वैद्यकीय तपासणीसाठी, अहवाल देण्यास भाग पाडले जाते. चीनी अधिकारी कोरोना विषाणूच्या रुग्णाला ओळखू तर शकतात पण त्यांच्या हालचालींचा मागोवा घेऊन ते कुणाकुणाच्या संपर्कात आले हेही शोधू शकतात.  मोबाईल ऍपची एक श्रेणी नागरिकांना संक्रमित रुग्णाच्या आसपास असल्यास सावध करते. अशा प्रकारचे तंत्रज्ञान केवळ पूर्व आशियापुरते मर्यादित नाही. नुकतेच इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी दहशतवाद्यांचा सामना करण्यासाठी राखून ठेवलेले तंत्रज्ञान कोरोना विषाणूच्या रुग्णांचा मागोवा घेण्यासाठी अधिकृत केले आहे. जेव्हा संसदीय उपसमितीने या उपायाला अधिकृत करण्यास नकार दिला तेव्हा पंतप्रधान नेत्यानाहू यांनी ‘आणीबाणीच्या हुकूमा’च्या साहाय्याने हे तंत्रज्ञान अधिकृत केले.

आपण कदाचित असा तर्क लावाल की, यात नाविन्य असे काही नाही. अलीकडच्या काळात ही दोन्ही सरकारे आणि कंपन्या अगदी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर लोकांचा मागोवा घेण्यासाठी, त्याने निरीक्षण करण्यासाठी आणि त्यांना हाताळण्यासाठी वापरत आहेत. पण जर आपण ही सावधगिरी बाळगली नाही तरीसुद्धा या इतिहासातील या साथीच्या काळातील एक महत्वाचे चिन्ह ठरेल. असे नाही की, हे देश  मोठ्या प्रमाणात लोकांच्या देखरेखीसाठी ही साधने उपयोजित करू शकतात, आतापर्यंत त्यांना नाकारण्यातही आले आहे. पण त्याहूनही महत्वाचे म्हणजे हे त्वचेवरून त्वचेमध्ये खूप नाट्यमयरित्या संक्रमित होण्याचे सूचक आहे. आतापर्यंत आपल्या बोटाने आपण आपल्या स्मार्टफोनवरून कोणत्या गोष्टी पाहतो हे बघण्यात सरकारला रस होता, परंतु आता कोरोना विषाणूमुळे  सरकारचे लक्ष्य बदलले आहे. आता सरकारला तुमच्या बोटाचे तापमान आणि त्याच्या खालील त्वचेचा रक्तदाब जाणून घ्यायचा आहे. 

आणीबाणीच्या अनुभवानंतर कळणारी किंमत – आपण आता देखरेखीच्या ज्या समस्यांना सामोरे जात आहोत त्यापैकी एक म्हणजे आपणा कोणालाच माहीत नाही की आपले सर्वेक्षण कोणत्या पद्धतीने सुरु आहे आणि येणारी वर्षे आपल्यासाठी काय घेऊन येऊ शकतात. देखरेखीचे तंत्रज्ञान वेगवान गतीने विकसित होत आहे. ज्या विज्ञान कल्पना आपण १० वर्षांपूर्वी पाहत होतो, त्या गोष्टी आता जुन्या बातम्या झाल्या आहेत. आपण एका प्रयोगाचा विचार करूया, समजा एका काल्पनिक सरकारने आपल्याला एक बायोमेट्रिक ब्रेसलेट वापरण्याची मागणी केली, ज्याद्वारे सरकार २४ तास आपल्या शरीराच्या तापमान आणि हृदयाच्या गतीचे निरीक्षण करेल आणि हा सगळा डाटा एकत्रित करून सरकारी अल्गोरिदमद्वारे त्याचे विश्लेषण करेल. त्या अल्गोरिदमद्वारे आपल्याला समजण्याआधीच त्यांना कळेल की आपण आजारी आहोत आणि त्यांना हेही की आपण कुठे होतो आणि कुणाकुणाला भेटलो होतो. यामुळे संक्रमणाची साखळी अत्यंत कमी केली जाऊ शकते, अगदी नष्टही करता येईल. अशी प्रणाली काही दिवसांत अशा साथीच्या रोगाच्या मार्गाला प्रभावीपणे थांबवू शकेल.  छान वाटते, बरोबर ना? 

मात्र याची नकारात्मक बाजू अशी आहे कि, या अशा भयानक देखरेख व्यवस्थेला कायदेशीरपणा मिळेल.  जर तुम्हाला माहिती असेल तर, उदाहरणार्थ जर मी सीएनएन ऐवजी फॉक्स चॅनेलवर क्लिक केले तर आपल्याला माझ्या राजकीय दृष्टिकोनाबद्दल अगदी माझ्या व्यक्तिमत्वाबद्दलसुद्धा बरीच माहिती मिळेल. मी व्हिडीओ पाहत असतानाच तुम्ही माझ्या शरीराचे तापमान, हृदयाचे ठोके आणि रक्तदाब निरीक्षण करीत असाल तर तुम्हाला समजू शकेल कि, मला कशामुळे हसू येते, कशामुळे रडू येते आणि कशामुळे मला खूप राग येतो. ताप, खोकला याप्रमाणेच राग, आनंद, कंटाळवाणे वाटणे, आणि प्रेम याही जैविक गोष्टी आहेत हे लक्षात ठेवणे खूप महत्वाचे आहे. खोकला ओळखू शकणारे तंत्रज्ञान आनंदही ओळखू शकेल. जर सरकार आणि कंपन्यांनी आपला बायोमेट्रिक डाटा काढण्यास सुरुवात केली तर ते आपल्याला आपल्यापेक्षा जास्त ओळखू शकतील. आणि मग ते आपल्या भावनांचा केवळ अंदाज लावू शकणार नाहीत तर त्यांना हवी असणारी गोष्ट विकण्यासाठी ते आपल्या भावनांमध्ये फेरफार करण्याची पण शक्यता आहे. मग ते एखादे उत्पादन असो किंवा राजकारणी.

बायोमेट्रिक डाटा निरीक्षण – केम्ब्रिज विश्लेषकांच्या मते डाटा हॅकिंग युक्त्यांपैकी एक मैलाचा दगड ठरू शकेल. दक्षिण कोरियाची २०३० मधील स्थितीची कल्पना करा जेव्हा तेथील प्रत्येक नागरिकाला २४ तास बायोमेट्रिक ब्रेसलेट घालावे लागेल. जर तुम्ही एखाद्या महान नेत्याचे भाषण ऐकत असाल आणि तुम्हाला राग आला असेल तर ते तुम्हाला राग आल्याचे सांगेल. तुम्ही नक्कीच आपत्काळात तात्पुरत्या परिस्थितीत घेण्यात आलेल्या या उपायासाठी केस करू शकता, की आणीबाणी संपल्यावर ती निघून जाईल. पण तात्पुरत्या उपाययोजनांमध्ये एक खवळलेली सवय असते. विशेषतः सीमांवर नेहमीच एक नवीन आणीबाणी लपलेली असते. उदाहरणार्थ माझ्या इस्राईल देशाने १९४८ च्या स्वातंत्र्ययुद्धाच्या काळात आणीबाणी घोषित केली होती. हे एक औचित्य आहे जे माध्यमांच्या नियंत्रणासाठी, विशेष नियमांनी जमिनी खालसा करण्यासाठी आणि युद्धानंतरच्या अनुभवांची किंमत कळण्यासाठी. (मी लहान आहे तुम्ही नाही) स्वातंत्र्ययुद्ध जिकंण्यासाठी बराच वेळ गेला. पण इस्राईलने आणीबाणी संपल्याचे जाहीर केले नाही. आणि १९४८ च्या आणीबाणीच्या काळात करण्यात आलेले तात्पुरते उपाय रद्द करण्यास ते अयशस्वी ठरले. (२०११ साली आणीबाणीच्या काळातील हुकूम विनम्रपणे रद्द करण्यात आले.)

कोरोना विषाणूचा संक्रमणाचा धोका पूर्णतः संपला तरी बायोमेट्रिक डाटासाठी भुकेले सरकार ही देखरेखीची बायोमेट्रीकी यंत्रणा जशीच्या तशी सरकारकडे ठेवणे आवश्यक असल्याचा युक्तिवाद करू शकतात. कारण कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेची भीती आहे, किंवा मध्य आफ्रिकेत इबोलाचा ताण नव्याने विकसित होत आहे. तुम्हाला कल्पना येऊ शकते. आपल्या गोपनीयतेबद्दल अलीकडच्या काही वर्षात एक मोठी लढाई सुरु आहे. कोरोना विषाणू हा या युद्धाचा महत्वाचा मुद्दा ठरू शकेल. जेव्हा लोकांना आरोग्य आणि गोपनीयता यापैकी एक गोष्ट निवडण्यास सांगितली जाती तेव्हा लोक साहजिकच आरोग्य निवडतील. 

साबणाची स्वछता – लोकांना गोपनीयता आणि आरोग्य निवडण्यास सांगणे हेच समस्येचे मूळ आहे. कारण ही एक चुकीची निवड आहे. आपण आनंद आणि गोपनीयता या दोन्हींचा आनंद घेतला पाहिजे आणि घेऊ शकतो. आपण आरोग्यमय राहणे आणि कोरोना विषाणू या साथीच्या रोगापासून सुरक्षित राहणे हे निवडू शकतो. पण असे एकपक्षीय राज्यकारभाराच्या देखरेखीच्या यंत्रणेच्या मदतीने नाही तर नागरिकांना सक्षम बनवून. अलीकडच्या आठवड्यात कोरोना विषाणूसाठी दक्षिण कोरिया, तैवान आणि सिंगापूरकडून काही महत्वपूर्ण प्रयत्न केले गेले आहेत, ज्यामध्ये त्याच्या उपाययोजनांचा समावेश आहे. या देशांनी लोकांचा मागोवा घेणाऱ्या काही अप्लिकेशनचा वापर केला आहे, पण ते संपूर्ण माहीती असणाऱ्या नागरिकांच्या सहकार्यासहित, व्यापक चाचण्या आणि प्रामाणिक अहवालांवर अवलंबुन आहेत. लोकांकडून मार्गदर्शक तत्वांचे पालन करून घेण्यासाठी केंद्रीकृत देखरेख आणि कठोर शिक्षा हा एकमेव फायदेशीर मार्ग नाही. जेव्हा लोकांना वैज्ञानिक बाबी सांगितल्या जातात, आणि लोक जेव्हा सार्वजनिक अधिकाऱ्यांवर या बाबी सांगण्यास विश्वास ठेवतात तेव्हा कोणत्याही बिग ब्रदरने त्यांच्यावर नजर न ठेवताही लोक योग्य गोष्टी करू शकतात. स्वयंप्रेरित आणि योग्य माहीती असणारी लोकसंख्या नेहमी पोलीस आणि अज्ञानी लोकसंख्येपेक्षा खूपच प्रभावी आणि शक्तिशाली असते. उदाहरणार्थ आपले हात साबणाने धुण्याचा विचार करा. मानवी स्वच्छतेच्या बाबींमधली आतापर्यंतची ही सर्वात मोठी गोष्ट ठरली आहे. या साध्या क्रियेमुळे दरवर्षी लाखो लोकांचे प्राण वाचतात. आपण ही  गोष्ट गृहीत धरीत असतानाच १९ व्या शतकात शास्त्रज्ञानी हात धुण्याचे महत्व शोधून काढले. पूर्वी अगदी डॉक्टर आणि नर्सेस सुद्धा हात न धुता एका शस्त्रक्रियेतून दुसऱ्या शस्त्रक्रियेसाठी जात असत. आज कोट्यवधी लोक दररोज हात धुतात ते केवळ साबणाच्या स्वच्छतेच्या भीतीपोटी? नाही. ते हात धुतात कारण त्यांना याचे तथ्य समजले आहे म्हणून तर मी माझे हात साबणाने धुतो कारण मी विषाणू आणि किटाणूंबद्दल ऐकले आहे. मला माहित आहे की हे सूक्ष्मजीव आजार पसरवतात आणि साबण त्यांना मारू शकतो. परंतु अशाप्रकारच्या अनुपालनासाठी आणि सहकार्यासाठी आपल्याला विश्वासाची गरज आहे.

विज्ञान आणि तंत्रज्ञानावरील विश्वासाची गरज – लोकांनी विज्ञानावर, सार्वजनिक यंत्रणेवर आणि माध्यमांवर विश्वास ठेवण्याची गरज आहे. गेल्या काही वर्षांमध्ये काही बेजबाबदार राजकारण्यांनी जाणीवपूर्वक विज्ञान आणि सामाजिक प्राधिकरण आणि माध्यमांवरचा विश्वास कमी केला आहे. आता याच बेजबाबदार राजकारण्यांना हुकूमशाहीच्या उच्च मार्गावर जाण्याचा मोह होऊ शकतो. तेही तुम्ही लोकांवर योग्य गोष्टी करण्यासाठीचा विश्वास ठेवू शकत नाही अशाप्रकारचा युक्तिवाद करून. साधारणपणे, वर्षानुवर्षे नष्ट झालेला विश्वास असा एका रात्रीत पुन्हा बांधता येऊ शकत नाही. पण ही सामान्य वेळ नाही. संकटाच्या क्षणी आपली मनेसुद्धा पटकन बदलू शकतात. आपण अनेक वर्षांपासून आपल्या भावंडांशी भांडत असतो. पण जेव्हा एखादी आपत्कालीन  परिस्थिती उद्भवते तेव्हा आपल्याला अचानक प्रेमाचा, आपुलकीचा लपलेला जलाशय सापडतो आणि आपण एकमेकांना मदत करण्यासाठी धावतो. देखरेखीची यंत्रणा उभी करण्यापेक्षा लोकांचा विज्ञानावर, सार्वजनिक अधिकाऱ्यांवर आणि माध्यमांवर विश्वास निर्माण करण्यास अजूनही उशीर झालेला नाही. आपण नवीन तंत्रज्ञानाचा वापर नक्कीच केला पाहिजे, पण या तंत्रज्ञानाने नागरिकांना सक्षम केले पाहिजे. मी माझ्या शरीराचे तापमान आणि रक्तदाब देखरेखीच्या संपूर्णपणे बाजूने आहे. परंतु त्याचा वापर एक शक्तिशाली सरकार तयार करण्यासाठी होता कामा नये. त्याऐवजी या माहितीने (डाटा) मला अधिक वैयक्तिक निवडीच्या पर्यायांसाठी आणि सरकारने घेतलेल्या निर्णयांबाबत त्यांना जबाबदार  धरण्यासाठी सक्षम केले पाहिजे. जर मी दिवसभरातल्या २४ तास माझ्या वैद्यकीय स्थितीचा आढावा घेऊ शकलो तर मला हे कळेलच की मी इतर लोकांच्या आरोग्यास धोकादायक ठरलो आहे की नाही पण हेही समजू शकेन की, माझे आरोग्य चांगले राहण्यासाठी कोणत्या गोष्टी मदत करू शकतील.

जर मी कोरोना विषाणूच्या प्रसाराच्या आकडेवारीच्या माहितीसह त्याचे विश्लेषण करू शकलो तर मी सरकार मला सांगत आहे ते सत्य आहे का? आणि या साथीच्या रोगाचा मुकाबला करण्यासाठी सरकार योग्य धोरणे वापरत आहे का? याचा न्यायनिवाडा करू शकेन. जेव्हा जेव्हा लोक देखरेख ठेवण्याबद्दल बोलतात तेव्हा तेव्हा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, सरकार जर देखरेखीच्या तंत्राज्ञानाचा वापर व्यक्तींवर नजर ठेवण्यासाठी करू शकते तर लोक या तंत्रज्ञानाचा वापर सरकारवर लक्ष ठेवण्यासाठीही करू शकतात.
अशाप्रकारे कोरोना विषाणू हा साथीचा रोग नागरिकांची एक मोठी परीक्षा आहे. पुढील काही दिवसांमध्ये आपल्यापैकी प्रत्येकाने निराधार षडयंत्र सिद्धांत आणि स्वतःची सेवा करणाऱ्या राजकारण्यांपेक्षा वैज्ञानिक डाटा आणि आरोग्य तज्ञ यांच्यावर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. आपले आरोग्य सुरक्षित ठेवण्यास हाच एकमेव मार्ग आहे असा विचार करून जर आपण निर्णय निवडण्यास अयशस्वी झालो तर कदाचित आपण आपले मौल्यवान स्वातंत्र्य गमावून बसू.

आवश्यकता जागतिक प्रयत्नांची –
आपण सामना करत असलेली दुसरी गोष्ट म्हणजे राष्ट्रीय अलगाव आणि जागतिक एकता. साथीचा रोग स्वतः आणि परिणामी आर्थिक संकट या दोन्ही जागतिक समस्या आहेत. त्या समस्यांचे निराकरण केवळ जागतिक सहकार्यानेच होऊ शकेल. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या विषाणूचा पराभव करण्यासाठी आपण जागतिक स्तरावर माहीती सामायिक केली पाहिजे. हाच या विषाणूवरचा मानवाचा सर्वात मोठा फायदा आहे. चीनमधला आणि अमेरिकेतील कोरोना विषाणू हे कोरोना विषाणूचे संक्रमण मानवाला कसे होते या माहितीची देवाणघेवाण करू शकत नाहीत. परंतु चीन अमेरिकेला कोरोना कोरोना विषाणूला कसे सामोरे जावे याबद्दल अनेक मौल्यवान धडे देऊ शकतो. इटलीच्या एखादया  डॉक्टरने  मिलानमध्ये सकाळी लावलेला शोध संध्याकाळी तेहरानमध्ये एखाद्याचा जीव वाचवू शकेल. जेव्हा यु के सरकार काही धोरणे राबविण्यासाठी संकोचत असतात तेव्हा महिन्याभरापूर्वी अशाच कोंडीचा सामना केलेल्या कोरियावासीयांसोबत सल्लामसलत करू शकतात. पण हे सगळे होण्यासाठी जागतिक सहकार्य आणि विश्वास भावना असणे गरजेचे आहे. देशांनी उघडपणे माहीती देण्यास आणि नम्रपणे सल्ला घेण्यास तयार असले पाहिजे. आणि मिळालेल्या माहितीवर आणि अंतर्दृष्टीवर विश्वास ठेवला पाहिजे. आम्हांला वैद्यकिय उपकरणे तयार करण्यासाठी आणि वितरणासाठी  विशेषतः तपासणी किट्स आणि श्वसनयंत्रांसाठी सुद्धा जागतिक प्रयत्नांची गरज आहे. प्रत्येक देशाने स्थानिक पातळीवर ते करणे आणि जी काही उपकरणे मिळत आहेत ती जमा करणे यापेक्षा एका समन्वयित जागतिक प्रयत्नांने खात्रीशीर जीवनरक्षक उपकरणे तयार करणे आणि ती वितरित करणे योग्य पद्धतीने होऊ शकते.  जसे राष्ट्रीय युद्धाच्या वेळी देश प्रमुख उद्योगांचे राष्ट्रीयकरण करतो त्याचप्रमाणे  मानवाच्या कोरोना विषाणू सोबतच्या  युद्धात ‘मानवीय’ या उत्पादनाची जास्त गरज आहे. कोरोना विषाणूचे काहीच रुग्ण असणाऱ्या श्रीमंत देशांनी आपण जेव्हा केव्हा अडचणीत येऊ तेव्हा हे आपल्या मदतीला धावून येतील या भावनेने गरीब देशांना मौल्यवान उपकरणे पाठविण्यास तयार असले पाहिजे. आपण वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी जागतिक रक्कम गोळा करण्यासाठी कदाचित जागतिक प्रयत्नांचा विचार करू. सध्या कमी प्रमाणात बाधित देश  याबाबतचा मौलिक अनुभव मिळविण्यासाठी आणि त्यांच्या गरजेच्या वेळी मदत मिळण्याच्या दृष्टीने जगातील खूप वाईट नुकसान झालेल्या देशांत त्यांच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना पाठवू शकतात. नंतर जर साथीच्या रोगावरचे लक्ष दुसरीकडे केंद्रित झाले तर मदत उलट्या दिशेने वाहू शकते.

आर्थिक नुकसान भरुन काढताना – आर्थिक आघाड्यांवरही जागतिक सहकार्याची नितांत गरज आहे. अर्थव्यवस्था आणि पुरवठा साखळीचे जागतिक स्वरूप पाहता जर देश इतर देशांकडे दुर्लक्ष करून त्यांच्या त्यांच्या पातळीवर करत असेल तर परिणामी भयंकर अनागोंदी माजून एक गंभीर समस्या उद्भवू शकेल. आम्हाला जागतिक कृती योजनेची आवश्यकता आहे आणि तीसुद्धा अत्यंत जलदरीत्या. आणखी एक आवश्यकता आहे ती म्हणजे प्रवासाचा जागतिक करार करण्याची. सर्व आंतरराष्ट्रीय प्रवास काही महिन्यांसाठी थांबविल्यामुळे प्रचंड त्रास होईल आणि कोरोना विषाणूच्या या युद्धात अडथळा निर्माण होईल. देशांनी कमीतकमी आवश्यक प्रवाशांना सीमा ओलांडण्यासाठी सहकार्य करणे आवश्यक आहे. वैज्ञानिक, डॉक्टर, पत्रकार, व्यावसायिक आणि राजकारणी यांना चर्चेसाठी प्रवास आवश्यकच आहे. आणि हे सगळे त्या प्रवाशांना त्यांच्या देशाने पूर्वतपासणी करून पाठविलेल्या जागतिक करारावर होऊ शकते. जर आपल्याला माहीत असेल की, काळजीपूर्वक तपासणी करूनच प्रवाशांना विमानात प्रवेश दिला जातो तर तुम्ही त्यांना तुमच्या देशात स्वीकारण्यास अधिक तयार असू शकता. दुर्दैवाने सध्या देश खूपच कष्टाने यातली एखादी  गोष्ट करत आहेत. एका सामूहिक पक्षाघाताने संपूर्ण जगाला वेढलेले आहे आणि खोलीत कुणी प्रौढ माणूस नसल्याचे दिसत आहे. एखाद्याने काही आठवड्यांपूर्वीच संपूर्ण जगातील नेत्यांची एक बैठक बोलवून सर्वसाधारण कृती योजना आखली असती. जी ७ (G7) नेत्यांनी फक्त या आठवड्यात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे एक बैठक आयोजित केली. पण परिणामी अशी कोणतीच योजना आखली गेली नाही.

याआधी २००८ सालचे आर्थिक संकट आणि  २०१४ ची इबोलाची साथ या जागतिक संकटामध्ये अमेरिकेने जागतिक नेत्याची भूमिका स्वीकारली. पण सध्या अमेरिकेने त्यांची भूमिका सोडली आहे. यातून हे खुप जास्त स्पष्ट होते की, त्यांना मानवतेच्या भवितव्यापेक्षाही अमेरिकेच्या महानतेची अधिक काळजी आहे. या प्रशासनाने अगदी जवळचे मित्रपक्षही सोडले आहेत. जेव्हा त्यांनी युरोपमधून प्रवासाला बंदी घातली तेव्हा त्यांनी या कठोर निर्णयाबद्दल किमान युरोपचा एखादा सल्ला घेऊया म्हणून युरोपला आगाऊ सूचना देण्याची तसदीही घेतली नाही. कोविड -१९ वरील लसीवरील मक्तेदारी हक्क विकत घेण्यासाठीजर्मनीच्या औषध कंपनीला १ अब्ज डॉलर देऊ केले आणि जर्मनीची बदनामी केली. जरी आताचे प्रशासन जागतिक कृती योजना घेऊन आले असेल, अखेरीस काही बदल घडवून आणत असेल. तरीसुद्धा काहीजण जे कधीच जबाबदारी स्वीकारत नाहीत, चुकांची कबुली देत नाहीत, दोष दुसऱ्यांवर सोडून श्रेय मात्र स्वतः घेतात अशा नेत्यांचे अनुकरण करतील. जर अमेरिकेने रिकाम्या सोडलेल्या जागा इतर देशांनी भरल्या नाहीत. तर या साथीच्या रोगाला थांबविणे खूप कठीण होऊन जाईल आणि पुढच्या काही वर्षांमध्ये आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये विष निर्माण होईल. तरीही प्रत्येक समस्या ही एक संधी आहे. आपण अशी आशा करूया की, सध्याचा साथीचा रोग मानवजातीस जागतिक मतभेदांमुळे होणाऱ्या तीव्र धोक्याची जाणीव करून देईल. मानवतेने पर्याय निवडण्याची गरज आहे, आपण मतभेदांच्या मार्गावरून प्रवास करू की, जागतिक एकतेचा मार्ग स्वीकारू? जर मतभेद निवडले तर हे संकटच फक्त लांबणीवर पडणार नाही तर भविष्यातही आणखी वाईट आपत्तींना सामोरे जावे लागेल. जर आपण जागतिक एकता निवडली तर केवळ कोरोना विषाणूच नाही तर भविष्यात येणाऱ्या सगळ्या साथीच्या आजारावर आणि २१ व्य शतकात मानवजातीला त्रास देणाऱ्या सर्व संकटांवर विजय प्राप्त करू.
 

युवाल नोआ हरारी हे सेपियन्स, होमो ड्यूस, २१ व्या शतकासाठी २१ धडे या पुस्तकांचे लेखक आहेत. या लेखाचा मुक्त अनुवाद जयश्री देसाई यांनी केला आहे. त्यांचा संपर्क – 9146042816