औरंगाबाद – कोरोना रुग्णांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरूळ लेणी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, लेणी पूर्णतः बंद करण्यात येऊ नयेत, अशी मागणी उद्योजक आणि औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या सिव्हिल एव्हिएशन कमिटीचे अध्यक्ष सुनीत कोठारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटकांची गैरसोय झाली आहे. ज्यांनी बुकिंग करून भारतामध्ये पर्यटनाचा बेत आखला आहे, त्यांनी आता काय करावे, असा प्रश्न आहे. कोरोनामुळे तिसऱ्यांदा पर्यटनस्थळे बंद झाली आहेत. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेनंतर वेरूळ आणि अजिंठा लेणी बंद होणार आहेत. मात्र लेणी बंद वातावरणात असलेल्या शॉपिंग मॉल्स आणि सिनेमा थिएटरपेक्षा नैसर्गिकरीत्या हवेशीर असतात. त्यामुळे संपूर्ण कोविड प्रोटोकॉलसह ही स्मारके सुरू ठेवावीत, परंतु पूर्णपणे बंद करू नयेत. कारण यामुळे औरंगाबादच्या पर्यटनावर अवलंबून असलेल्या सर्वांचे प्रचंड नुकसान होईल, असे कोठारी यांनी नमूद केले.
शॉपिंग मॉल्स, सिनेमा थिएटर्स आणि आता जिम्नॅशियमला 50 टक्के क्षमतेने काम करण्याची परवानगी आहे. पण वेरूळ आणि अजिंठा यासारखी स्मारके पूर्णपणे बंद झाली तर पर्यटन क्षेत्रासाठी अन्यायकारक आहे. ही स्मारके वारंवार बंद केल्यामुळे गाईड, कार, बस आणि टॅक्सी ऑपरेटर, ट्रॅव्हल एजंट, टूर ऑपरेटर, हस्तकला आणि यासारख्या पर्यटन उद्योगातील सर्व भागधारकांवर नकारात्मक प्रभाव पडेल, असे सुनीत कोठारी यांनी नमूद केले आहे.