WWE स्टार ब्रे वॅटचे निधन; वयाच्या 36 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंट स्टार ब्रे वॅटचे (Bray Wyatt) गुरुवारी वयाच्या 36 व्या वर्षी निधन झाले आहे. गुरूवारी ब्रे वॅटचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. याबाबतची माहिती WWE अधिकारी पॉल “ट्रिपल एच” लेवेस्क यांनी दिली आहे. या बातमीमुळे संपूर्ण क्रीडाविश्वाला धक्का बसला आहे. ब्रे वॅटने आपल्या फायटींग स्किल्सने चाहत्यांमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली होती. गेल्या काही दिवसांपूर्वीच ब्रे वॅट पुन्हा रिंगणात उतरणार असल्याचे म्हणले जात होते. मात्र त्यापूर्वीच त्याचे निधन झाले आहे.

ट्रिपल एच यांचे ट्विट

गुरूवारी चारच्या सुमारास ट्रिपल एचने एक ट्विट केले होते. या ट्विटमध्ये त्यांनी, “WWE हॉल ऑफ फेमर माईक रोटुंडा याचा नुकताच एक कॉल आला, ज्याने आम्हाला दुःखद ही बातमी कळवली. तो म्हणाला, आमच्या WWE कुटुंबातील आजीवन सदस्य, विंडहॅम रोटुंडा, ज्याला ब्रे वॅट म्हणून ओळखले जाते, त्याचे आज आकस्मित निधन झाले. आमचे विचार आणि सद्भावना त्यांच्या कुटुंबासोबत आहेत, आम्ही विनंती करतो की प्रत्येकाने यावेळी त्यांच्या गोपनीयतेचा आदर करावा” अशी माहिती दिली.

गेल्या अनेक काळापासून ब्रे वॅटची तब्येत खालावलेली होती. त्यामुळे त्याचे खेळणे बंद झाले होते. मात्र याबाबत कोणताही खुलासा करण्यात आलेला नव्हता. ब्रे वॅटचे पूर्ण नाव विंडहॅम रोटुंडा असे होते. रोटुंडा हा तिसर्‍या पिढीतील कुस्तीपटू होता. विंडहॅम रोटुंडाने कुटुंबाचा वारसा चालवत आपली क्रीडा विश्वात एक वेगळी जागा निर्माण केली होती. तो माइक रोटुंडाचा मुलगा आणि ब्लॅकजॅक मुलिगनचा नातू होता. आज त्याच्या जाण्याने चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ब्रे वॅटच्या निधनाच्या बातमीनंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून चाहत्यांकडून त्याला श्रद्धांजली वाहिली जात आहे.