औरंगाबाद | शहरातील बालरुग्णालयांमधील ३० टक्के बालरुग्ण हे कोवीड पॉझिटिव्ह असल्याचे दिसून येत असले, तरी ९९ टक्के बालरुग्णांमध्ये कोणतीही गंभीर गुंतागुंत होत नसल्याचा नक्कीच दिलासा आहे, असेही बालरोगतज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. मात्र करोना होऊन गेल्यानंतर दोन-तीन आठवड्यांनी तीव्र ताप किंवा अन्य गंभीर लक्षणे दिसत असतील, तर मात्र वेळीच उपचार होणे गरजेचे आहे, असाही इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
जिल्ह्यामध्ये आतापर्यंत ९०० पेक्षा जास्त मुले ही कोरोनाबाधित झाल्याची अधिकृत नोंद झाली आहे. त्यातच घाटीमध्ये एकाच दिवशी तीन बालरुग्णांचा मंगळवारी मृत्यू झाल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे पालकांमध्ये काहीशी धास्ती वाढली आहे. मात्र पालकांनी घाबरण्याचे कारण नाही, असेही तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
बालरोगतज्ज्ञ डॉ. राजेंद्र खडके म्हणाले, ‘सध्या बाह्य रुग्ण विभागातील (ओपीडी) सुमारे ३० टक्के बालरुग्ण हे कोरोनाबाधित असल्याचे दिसून येत आहे. मात्र बालरुग्ण कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले, तरी घाबरण्याचे कारण नाही. अशा बालरुग्णांना दोन ते तीन दिवस ताप असतो आणि त्यानंतर तो कमी होताना दिसतो. चौथ्या किंवा पाचव्या दिवशी ताप असला तरच काही तपासण्या करण्यास सांगितले जाते आणि त्यानंतरही असे बालरुग्ण औषधोपचारांनी बरे होतात, असाच अनुभव आहे. फार कमी बालरुग्णांचा एक्स-रे काढण्याची वेळ येते.
सिटी स्कॅन किंवा इतर कोणत्या चाचण्या करण्याची गरज पडत नाही. मुख्य म्हणजे ९९.९ टक्के कोवीड पॉझिटिव्ह बालरुग्णांमध्ये मृत्यू होत नाही. तसेच गंभीर गुंतागुंत होण्याची शक्यताही फार कमी असते. मात्र, करोना होऊन गेल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यानंतर तीव्र ताप किंवा इतर लक्षणे आढळून आली तर लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे ठरते. अशा काही रुग्णांना आयसीयूची गरज लागू शकते. मात्र अशा स्थितीतील बालरुग्णही बरे होण्याचे प्रमाण नक्कीच आशादायी आहे व आतापर्यंत फार कमी मृत्यू झाले आहेत.