आबिटकर म्हणतायत ‘आमचं ठरलं’, गोकुळला विरोधी आघाडीसोबतच

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : गोकुळ दूध संघ सध्या काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील व भाजपचे माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्याकडे आहे. ही सत्ता उलथून टाकण्याचा निर्धार करत पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीची स्थापना केली आहे. या आघाडीमध्ये काँग्रेस, शिवसेना, जनसुराज्य पक्ष तसेच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, खासदार प्रा. संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने व आमदार विनय कोरे यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश आहे. शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत विरोधी राजर्षी शाहू आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय शुक्रवारी सकाळी गारगोटी येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत जाहीर केला.

विरोधी आघाडीत त्यांना किती जागा मिळणार हे स्पष्ट झालेले नाही. परंतू तरीही त्यांनी नंदकुमार ढेंगे, अभिजित तायशेटे यांच्यासाठी आग्रह धरल्याचे सांगण्यात येते. त्यांना गोकुळमध्ये एक जागा देवून जिल्हा परिषदेत आबिटकर गटाच्या वंदना जाधव यांना सत्तेत संधी द्यावी असाही प्रस्ताव आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत आमदार आबिटकर यांनी पाठिंब्याचा निर्णय जाहीर केला. लोकमतने दोन दिवसांपूर्वीच आबिटकर हे विरोधी आघाडीसोबतच राहतील असे वृत्त दिले होते.

आबिटकर गटाला दोन्ही आघाड्यांकडून पायघड्या घालण्यात आल्या होत्या. या गटाला मानणारा राधानगरी व भुदरगड तालुक्यात ठरावधारक वर्ग आहे. त्यांच्याकडे सुमारे दीडशे ठराव असल्याचा दावा केला जातो. त्यामुळेही या गटाच्या भूमिकेला महत्त्व आले. गेल्या निवडणूकीत हा गट विरोधी आघाडीसोबतच होता. परंतू विधानसभेला काँग्रेसचे आमदार व गोकुळच्या सत्तारुढ आघाडीचे नेते पी.एन.पाटील यांची मदत झाल्याने आबिटकर यांच्यापुढे खासदार संजय मंडलिक की आमदार पी. एन. पाटील यांपैकी कुणासोबत जायचे, असे धर्मसंकट उभे राहिले होते.आबिटकर यांनी पहिली निवडणूक मंडलिक ब्रँडवर लढविली. त्यामुळे मंडलिक गटाशी त्यांची जवळीक जास्त आहे. त्यातही ते शिवसेनेचे आमदार आहेत. विरोधी आघाडी दोन्ही काँग्रेससह शिवसेनाही सहभागी आहे. पक्षीय बंधन, मंडलिक यांच्यासोबतची बांधिलकी, पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासोबतची जवळीक याचा विचार करून त्यांनी विरोधी आघाडीसोबत राहण्याचा निर्णय घेतला.

Leave a Comment