पैलवान विजय चौधरी लोकसभा निवडणुक लढवणार? पक्ष आणि मतदारसंघ कोणता असेल?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यांत आगामी निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. अशातच पैलवान विजय चौधरी याने देखील लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. माध्यमांशी बोलताना, “भारतीय जनता पक्षाने पुढे जर संधी दिली तर आपण लोकसभा निवडणूक लढण्यास तयार असू” असे विजय चौधरी याने म्हणले आहे. त्यामुळे आता विजय चौधरी याला भाजपकडून उमेदवारी देण्यात येईल का? याबाबत राजकिय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

कुस्तीच्या आखाड्यात अनेकांना चितपट करणारा पैलवान म्हणून विजय चौधरी याची ओळख आहे. विजय चौधरी हा ट्रिपल महाराष्ट्र केसरी पैलवान आहे. त्यानेच आता आपली राजकीय महत्वकांक्षा जाहीर केली आहे. कुस्तीच्या आखाड्यानंतर आता आपल्याला निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची इच्छा असल्याचे विजय चौधरी याने सांगितले आहे. विजय चौधरी याने म्हणले आहे की, अद्याप कोणत्याही पक्षाची मला ऑफर देण्यात आलेली नाही. मात्र भारतीय जनता पक्ष आपला आवडता पक्ष आहे. त्या पक्षाने संधी दिल्यास मी नक्कीच निवडणूक लढण्यास तयार आहे.

त्याचबरोबर, विजय चौधरी याने आपल्याच जिल्ह्यातून म्हणजेच जळगाव लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. विजय चौधरी मूळचा जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूक देखील याच गावातून लढवेल असे विजय चौधरी याने सांगितले आहे. सध्या या मतदार संघात भाजपचे उन्मेष पाटील खासदार आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच भाजप उन्मेष पाटील यांना पर्याय शोधत असल्याची चर्चा रंगली होती. त्यामुळे विजय चौधरी याच मतदार संघातून निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, 2017 साली विजय चौधरी याची पोलीस उपअधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. सध्या तो पुणे पोलीस दलात वाहतूक शाखेचे उपअधीक्षक म्हणून कार्यरत आहे. परंतु आता त्याने राजकिय क्षेत्रात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आगामी निवडणुकीत विजय चौधरी राजकारणात पाऊल ठेवण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.