“सतीप्रथा बंद करणारा औरंगजेब पहिला राजा”; भालचंद्र नेमाडेंचे खळबळजनक वक्तव्य

bhalchandra nemade
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईत मराठी ग्रंथ संग्रहालयतर्फे पार पडलेल्या शतकोत्तर रौप्य महोत्सव कार्यक्रमात लेखक भालचंद्र नेमाडे यांनी औरंगजेबाविषयी  केलेल्या महत्वपूर्ण वक्तव्यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. या कार्यक्रमात बोलताना भालचंद्र नेमाडेंनी (Bhalchandra Nemade) औरंगजेब (Aurangzeb) हा पहिला राजा होता ज्याने सतीप्रथा बंद केली असा दावा केला आहे. तसेच, “काशी विश्वेशराला गेलेल्या औरंगजेब बादशाहच्या राण्यांना तेथील हिंदू पुजाऱ्यांनी भ्रष्ट केलं. ही गोष्ट जेव्हा औरंगजेबाला कळाली तेव्हा त्याने काशी विश्वेश्वराची तोडफोड केली” असे खळबळजनक वक्तव्य ही नेमाडेंनी केले आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. तसेच अनेकांनी त्यांच्यावर टीका देखील केली आहे.

शतकोत्तर रौप्य महोत्सव कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी बोलतांना त्यांनी, “औरंगजेबाच्या दोन हिंदू राण्या होत्या. त्या काशी विश्वेश्वराला दर्शनाला गेल्या. त्या परत आल्याच नाहीत. छावणीतल्या लोकांनी ही गोष्ट औरंगजेबाला सांगितली. काय झालं असेल याची चौकशी करत करत सगळे गेले तर. काशी विश्वेश्वरामध्ये एक भुयार होतं. तिथे मंदिरातील पंडित बायकांना नेऊन भ्रष्ट करायचे. औरंगजेबाच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्याने मग तिथे मोडतोड केली. तसेच ही असली माणसं नकोत म्हणून त्याने काहींना मारलं” असे सांगितले आहे.

त्याचबरोबर , “औरंगजेबाने केलेल्या या कृत्यामुळे त्याला  पुढे इतिहासात हिंदूद्वेष्टा म्हणून हिणवलं गेलं. पण त्याच्या सैन्यात ५० टक्क्यांहून अधिक लोक हे हिंदू होते” असेही  भालचंद्र नेमाडे यांनी म्हणले आहे. पुढे बोलताना, “औरंगजेबाच्या काळात निम्म्यापेक्षा जास्त हिंदू सरदार होते. सती प्रथा बंद करणारा पहिला औरंगजेब होता. सध्या रोज बातम्या येतात, बायका भ्रष्ट केल्याच्या. तीनशे, साडे तीनशे लहान मुली पळवून नेल्या. सध्या इथे राहायचं कसं? हा प्रश्न आहे” अशी भूमिका नेमाडे यांनी या कार्यक्रमात बोलताना मांडली आहे.

दरम्यान, राज्यात सुरू असलेल्या औरंगजेब, ज्ञानव्यापी मशीदीच्या वादावर देखील नेमाडे यांनी महत्वपूर्ण वक्तव्य केले आहे. “तुम्ही ग्रंथ पुस्तकं वाचली तर तुम्हाला सत्य समजेल, म्हणून ते वाचायला हवं. कुणाचं काही ऐकू नका तर वाचा” असे कार्यक्रमावेळी नेमाडे यांनी म्हणले आहे. सध्या भालचंद्र नेमाडे यांनी केलेल्या या वक्तव्यांमुळे आता त्यांच्यावर टीकाटिपणी होण्यास सुरुवात झाली आहे. अनेकांनी त्यांच्या या वक्तव्यावर आक्षेप नोंदवला आहे. मुख्य म्हणजे, नेमाडे यांच्याकडून सांगण्यात आलेल्या औरंगजेबाच्या इतिहासामुळे वेगवेगळया चर्चांना उधाण आले आहे.