हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये आजच्या तिसऱ्या दिवशी मुंबईकर अजिंक्य रहाणे आणि शार्दूल ठाकूर यांनी कांगारूंना कडवी झुंज देत भारताचा डाव सावरला आहे. सध्या भारताची धावसंख्या २६२- ७ अशी असून रहाणे आणि शार्दूलने भारताची इज्जत काही प्रमाणात वाचवली आहे. दोघांनीही आत्तापर्यंत १०९ धावांची भागीदारी करत भारताची विजयाशी आशा जिवंत ठेवली आहे.
भारतीय संघाने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत काल पाच विकेट्सवर 151 धावा केल्या होत्या. आज यष्टीरक्षक के भरत आणि अजिंक्य रहाणे यांनी भारताच्या डावाची सुरुवात केली. भरत अवघ्या ५ धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेल्या शार्दूल ठाकूरने रहाणेला चांगली साथ दिली. दोघांनीही ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा अतिशय झुंजारपणे सामना करत १०८ धावांची भागीदारी रचली आहे. अजिंक्य रहाणे कमिन्सच्या गोलंदाजीवर ८९ धावांवर बाद झाला आणि ही भागीदारी तुटली. भारतीय संघ अजूनही 208 धावांनी मागे आहे.
तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाच्या 469 धावांसमोर भारतीय फलंदाजी पुन्हा एकदा ढेपाळली आहे. भारताबाहेर खेळत असताना भारतीय फलंदाजांची खराब कामगिरी अजूनही सुरूच आहे. कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा अपयशी ठरला आहे. रोहित अवघ्या १५ धावा काढून बाद झाला, तर विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, शुभम गिल यांनाही खेळपट्टी वर जास्त काळ तग धरता आलेला नाही. कोहली १४, गिल, १३ आणि पुजारा १४ धावांवर बाद झाले.