औरंगाबाद – कोरोनामुळे वर्षभरापासून शाळा चालू-बंदचा खेळ सुरु आहे. या काळात तांत्रिक अडचणींमुळे बहुतांश विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेता आले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पाहिजे तेवढा वेळ मिळालेला नाही. दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी परीक्षा पुढे ढकलाव्यात, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे करण्यात आली आहे. याबाबत विभागीय मंडळाचे सचिव यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले की, कोरोनामुळे 2021-22 मध्ये शाळा, कॉलेज बंद होते. अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शाळांनी ऑनलाईन सत्र सुरु केले असले तरी, ग्रामीण भागातील बहुतांश विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणीमुळे शिक्षण घेता आले नाही. मध्यंतरीच्या काळात शाळा, कॉलेज खुली करण्यात आली. त्यावेळी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शाळा, शिक्षकांमध्ये स्पर्धा चालल्याचे चित्र होते. त्यामुळे काहीच समजले नसल्याचा विद्यार्थ्यांचा सूर आहे.
दरम्यानच्या काळात सुरु करण्यात आलेल्या शाळा ओमिक्रॉनमुळे पुन्हा बंद करुन ऑनलाईन सुरु झाल्या. या ऑनलाईन-ऑफलाईनच्या खेळात विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे. त्यातच बोर्डाने आता दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईन होणार असल्याचे जाहीर केले आहे. परीक्षेसाठी विद्यार्थी शैक्षणिक व मानसिकदृष्ट्या सक्षम नाहीत. परीक्षांसाठी पुरेसा वेळ अभ्यासासाठी मिळाल्या नसल्यामुळे विद्यार्थी प्रचंड तणावाखाली आहेत. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी विनंती विद्यार्थ्यांनी केली आहे. त्याअनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे विभागीय मंडळाला निवेदन दिले आहे.
प्रमुख मागण्या –
– दहावी, बारावीच्या परीक्षा मे महिन्यांपर्यंत पुढे ढकलाव्यात,
– जो अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लासमध्ये समजला नाही,
– त्यासाठी प्रत्यक्ष अधिकचे तास घेवून पूर्ण करुन घ्यावा
– विद्यार्थी हितासाठी शाळा, कॉलेजमध्ये समुपदेशकांची नेमणूक करा