टीम, HELLO महाराष्ट्र । देशातील सर्वात मोठी फिल्म कंपनी असलेलली ‘यशराज फिल्म्स’ अडचणीत येण्याची शकयता निर्माण झाली आहे. ‘यशराज फिल्म्स’ विरोधात १०० कोटींच्या फसवणुकी प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बॉलीवूड मध्ये मोठी खळबळ माजली आहे. ‘द इंडियन परफॉर्मिंग राईट्स सोसायटी’ यांच्या तक्रारीनंतर हा दाखल करण्यात आला असल्याचे उघड झाले आहे. ‘यशराज फिल्म्स’ कंपनी हि प्रसिद्ध निर्माता , दिग्दर्शक यश चोप्रा यांच्या मालकीची आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांची मुले आदित्य चोप्रा आणि उदय चोप्रा कंपनी सांभाळत आहेत.
दरम्यान ‘आयपीआरएस’ द्वारे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, ”यशराज फिल्म्सने कलाकारांना काही संशयास्पद करारांवर स्वाक्षरी करण्यास भाग पाडलं आणि त्यांना रेडियो स्टेशन्स, संगीत स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवरुन मानधन घेण्यासही मज्जाव केला.” प्राथमिक तपास आणि पुराव्यांच्या आधारे यशराज फिल्म्स आणि त्यांचे सर्वेसर्वा असलेले आदित्य चोप्रा, तसेच उदय चोप्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तपास सुरु असून गरज पडल्यास आदित्य चोप्रा आणि उदय चोप्रा यांना चौकशीसाठी बोलावण्यात येईल, अशी माहिती या प्रकरणाचा तपास अधिकाऱ्याने दिली आहे.