व्यक्तिविशेष | अक्षय पाटील
सध्या संपूर्ण महाराष्ट्रात एस. टी. कामगारांच्या मागण्या आणि संपाची चर्चा सुरू आहे. राज्य परिवन महामंडळाचे सरकार मध्ये विलनिकरण करण्यात यावे अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. खर तर एस टी म्हणजे आपल्या या लालपरीला महाराष्टातील ग्रामीण भागाची जीवनदायीनी म्हंटले जाते. गाव तिथे रस्ता आणि रस्ता तिथे एस टी हे एस टी चे ब्रीदवाक्यच आहे जणू. पण गाव तिथे एस टी ही संकल्पना कोणी आणली हे आपल्याला माहीत आहे का?? ही संकल्पना आणली महाराष्ट्राचे कार्ल मार्क्स म्हणून ओळखले जाणारे माजी मंत्री यशवंतराव मोहिते यांनी..
1960 मध्ये भाऊ उपगृहमंत्री असताना परिवहन मंत्री हे खातेच अस्तित्वात नव्हते. त्यामुळे भाऊंनाच परिवहन खात्या संदर्भातील प्रश्न सोडवावे लागत होते. त्यांनी प्रवासी वाहतूक सेवेचे राष्ट्रीयीकरण करण्याचा निर्णय घेतला. प्रवाशांची सोय हा महामंडळाचा मुख्य हेतू होता. म्हणून भाऊंनी प्रवाशांसाठी अधिक सुविधा कशा मिळतील हे पहिले. त्यासाठी नवीन भागात गाड्या सुरु करणे, गाड्यांचा दर्जा चांगला ठेवणे, पुरेसा कर्मचारी वर्ग नियुक्त करणे, आर्थिक शिस्त पाळणे, अर्थकारण आवाक्याबाहेर गेल्यावर माफक भाडेवाढ करून तोटा भरून काढणे असे अनेक निर्णय या काळात भाऊंनी घेतले.
महामंडळाचा कारभार गतिशील कसा होईल यावर यशवंतराव भाऊंचा कटाक्ष होता, या महामंडळावर कर्तबगार सदस्यांची नेमणूक केली. त्या मध्ये पतंगराव कदम, शिवाजीराव भोसले, बराले साहेब, हिरुभाऊ जगताप, शशिकुमार देशमुख आदींचा समावेश होता. या सदस्यांच्या माध्यमातून अधिकाधिक सुधारणा करण्याचा प्रयत्न भाऊंनी केला. जादा लोकवस्ती च्या ठिकाणी शहरात मोठी बसस्थानके, पीक अप शेड बांधली त्यामुळं प्रवाशांची ऊन्हा व पावसा पासून सुटका झाली. एस टी मूळे खेड्या- पाड्यातील मुलं शिक्षणासाठी शहरात जाऊ लागली. शेतमाल, दूध ,भाजीपाला शहरात जाऊ लागला. त्यामुळं ग्रामीण अर्थकारणास चालना मिळाली व त्याचा महाराष्ट्राच्या जडणघडणी मध्ये फायदा झाला.
भाऊंनी याच काळात “गांव तिथे रस्ता व रस्ता तिथे एसटी” असं धोरण आखले. त्यातून ग्रामीण भागात अनेक मार्गावर एसटी बस सुरु होऊन त्या निमित्ताने उद्योग – व्यवसाय, नोकरी, शिक्षण, आरोग्य या माध्यमातून अर्थकारण एक भक्कम होऊ लागलं. याचा जनतेला खूप फायदा झाला. एवढं करत असताना एस टी गाड्यांचे कर्मचारी पगार, टायर, सुटे भाग, दुरुस्ती देखभाल यांचा खर्च वाढत असला तरी प्रवाशांच्या खिशाला कमीत कमी कात्री लावून अल्प नफ्यात एस टी महामंडळ चालविण्याचा एक आदर्श घालून दिला की जो आज पर्यंत सुरु आहे.
कोण होते यशवंतराव मोहिते-
यशवंतराव मोहिते यांचा जन्म सातारा जिल्हयातील कर्हाड जवळील रेठरे बुद्रुक येथे ७ नोव्हेंबर १९२० रोजी झाला. विज्ञान शाखेचे इन्टरपर्यंतचे महाविद्यालयीन शिक्षण घेतले होते. मात्र बंडखोर विचारांचा प्रभाव असलेल्या यशवंतरावांनी विद्यार्थीदशेपासूनच सामाजिक चळवळीत भाग घेतला. मार्क्सवादी विचारांनी भारावलेले यशवंतराव पुढे शेतकरी-कामगार पक्षात (शे.का.प) सामील झाले.
१९५२ ची विधानसभेची निवडणूक यशवंतराव मोहिते यांनी शेकापतर्फे लढविली व जिंकली. १९६० मध्ये ते काँग्रेसचे सदस्य झाले व संयुक्त महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात गृह उपमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यानंतर राज्याच्या मंत्रिमंडळात यशवंतराव मोहिते यांनी कृषी उपमंत्री, गृहनिर्माण आणि परिवहन, अन्न व नागरी पुरवठा, सहकार, अर्थमंत्री अशी विविध पदे भूषविली. कोयना धरणाच्या उभारणीत त्यांचा मोठा वाटा होता. गाव तेथे एस.टी’ ही घोषणा अंमलात आणून त्यांनी बससेवेचे जाळे राज्यभर पसरले. महाराष्ट्राचे कृषी, सहकार, वित्त मंत्री म्हणून त्यांनी सामान्य नागरिकांच्या हिताचे अनेक कायदे आणि योजना अंमलात आणल्या.