मुंबई । रिलायन्स (एडीएजी) समुहाचे प्रमुख अनिल अंबानी यांच्या संकटात येत्या काळात वाढ होण्याची शक्यता आहे. खासगी क्षेत्रातील येस बँकेनं त्यांच्याविरोधात कारवाईचा बडगा उचलण्याचा निर्णय घेतला आहे. येस बँके’नं अनिल अंबानी यांच्या मुंबईतील सांताक्रुज परिसरातील मुख्यालयासाठी नोटीस ऑफ पझेशन पाठवलं आहे. येस बँकेकडून घेतलेलं कर्ज अनिल अंबानी यांनी न फेडल्यानं बँकेनं ही कारवाई केल्याचं सांगितलं आहे. डिफॉल्टर्सचे असेट्स आपल्या ताब्यात घेत त्याची विक्री करण्याचा अधिकार बँकांना असल्याने येस बँकेनं कर्जवसुलीसाठी रिलायन्स (एडीएजी) समुहाचे मुख्यालय ताब्यात घेण्याचं ठरवलं आहे.
अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समुहावर विविध बँकांचं १२ हजार कोटी रूपयांचं कर्ज आहे. यापैकी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला येस बँकेनं २ हजार ८९२ कोटी रूपयांचं कर्ज दिलं होतं. हे कर्ज अनिल अंबानी यांनी न फेडल्यानं बँकेनं कर्जाच्या रकमेच्या परतफेडीसाठी करण्यात आली आहे. त्यानुसार येस बँकेनं मुंबईतील सांताक्रुज परिसरातील मुख्यालयासाठी नोटीस ऑफ पझेशन पाठवलं आहे. तसंच या मुख्यालयाव्यतिरिक्त दक्षिण मुंबईतील रिलायन्सच्या नागिन महल येथील दोन कार्यालयेही ताब्यात घेण्यासाठी नोटीस पाठवण्यात आली आहे.
दरम्यान, कारवाई करण्यापूर्वी बँकेनं अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समुहाला ६० दिवसांती नोटीस पाठवली होती. ५ मे रोजी याची मुदत पूर्ण झाली. परंतु कंपनीकडून कर्जाची रक्कम भरण्यात आली नाही. त्यानंतर बँकेनं SARFAESI Act 2002 अंतर्गत कारवाई केल्याचं बँकेकडून सांगण्यात आलं. आपल्या संपत्ती विकावी लागली तरी चालेल पण आपण बँकांचं सर्व कर्ज फेडणार असल्याचं यापूर्वी अंबानींनी म्हटलं होतं. सध्या येस बँक मोठ्या संकटातून जात आहे. बँकेवर मोठ्या प्रमाणात ‘बॅड लोन’चं ओझं आहे. ते कमी करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न बँकेकडून केले जात आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”