टीम, HELLO महाराष्ट्र। राज्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘मी पुन्हा येईन… मी पुन्हा येईन’ ही घोषणा चांगलीच गाजलेली होती. परंतु निकालानंतर भाजप ऐवजी महाविकास आघाडीचे सरकार आल्याने सत्ताधाऱ्यांकडून या घोषणेची खिल्ली उडवण्यात आली. आता पुन्हा एकदा ही घोषणा चर्चेचा विषय ठरली आहे. कारण नागपुरात सध्या भाजपकडून ‘ तुम्ही पुन्हा येणार..पुन्हा येणार’ अशी बॅनर्स लावण्यात आले आहे.
सोमवार पासून नागपुरात विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. त्यामुळे याच पार्श्वभूमीवर भाजपकडून नागपुरातील लॉ कॉलेजकडून विधानभवनकडे जाणाऱ्या मार्गावर अनेक बस स्टॉपवर देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ ‘तुम्ही पुन्हा येणार.. पुन्हा येणार’चे बॅनर्स लावण्यात आले आहेत. त्यामुळे हे बॅनर्स सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. एकीकडे महाविकास आघाडीकडून आमचं सरकार पाच वर्षे टिकणारच असा विश्वास व्यक्त केला जातोय, तर भाजपचे नेते मंडळीही पुन्हा भाजपची सत्ता येणार असल्याचा आशावाद व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे नेमकं काय सुरु आहे याचा सामान्यनागरिकांना मात्र काही थांगपत्ता लागत नाही. विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी निवडणुकी पूर्वी काढलेल्या महाजानदेश यात्रेत मी पुन्हा येईन ही घोषणा दिली होती.