सांगली | सध्या समाजामध्ये दिखावेगिरीला प्रचंड प्राधान्य दिले जाते.अगदी छोटा – मोठा कार्यक्रम असेल तरी भपकेबाज आणि दिखाऊगिरी करणारे कार्यक्रम आयोजित करून कार्यक्रमाचे नियोजन केले जाते पण मुढेवाडी ता. आटपाडी ( सांगली ) येथील अक्षय नामदेव खोत या युवकाने अशा सगळ्या बाबींना फाटा देत एक नवीन आदर्श लोकांसमोर घालून दिला आहे. अक्षयने वाढदिवसाआधी गावातील लोकांच्या समस्या जाणून घेतल्या त्यात त्याला प्रकर्षांने कागदपत्रासंबंधी लोकांच्या प्रमुख अडचणी असल्याचे लक्षात आले.
त्याचवेळी त्याने ठरवले की आपला वाढदिवस हा आधार कार्ड कॅम्प राबवून साजरा करायचा आणि त्याने तशी कृती देखील करून दाखवली दि. २७ रोजी अक्षयचा वाढदिवस होता. त्याने गावात नवीन आधारकार्ड काढून देणे,आधारकार्ड दुरुस्ती करून देणे आदी कामे मोफत तर नवीन पॅनकार्ड आणि दुरुस्ती ५० % स्वतः तर ५०% खर्च लाभार्थी यांच्याकडून घेत लोकांना पॅनकार्ड , ई श्रम कार्ड , देखील काढून दिले तसेच काही लोकांचे ई – केवायसी देखील करून दिले.
या कार्यक्रमाला उद्घाटक आटपाडी – खानापुरचे आमदार अनिल बाबर,राष्ट्रीय समाज पक्षाचे सांगली जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण सरगर, युवा नेते संतोष पुजारी यांची प्रमुख उपस्थिती होती. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरपंच अनिल मुढे, सतीश मुढे, शशिकांत म्हारणुर, विलास मुढे, आकाश खोत, मायाप्पा खोत आदी दिवसभर युवकवर्ग उपस्थित होते. अक्षयच्या या उपक्रमाचे परिसरात मोठ्या प्रमाणावर कौतुक केले जात आहे.