Friday, June 2, 2023

रात्री शेतात मोटार चालू करायला म्हणून गेला अन् माघारी आलाच नाही; नक्की काय झालं?

सोलापूर | गळफास घेऊन बारावीच्या विद्यार्थ्याने आपले जीवन संपविल्याची घटना सोलापूर येथे घडली आहे. शेतातील मोटार चालू करण्यास जातो असे सांगून गेलेल्या एका तरुणाने शेतात लिंबाच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केलीय. सूरज केशव आवटे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो बार्शी तालुकातील जामगावचा रहिवासी होता.

सुरज हा 12 वीत शिकत होता. त्याने नुकतीच परीक्षा दिलेली आहे. 14 एप्रिल रोजी तो घरातून रात्री नऊच्या सुमारास शेतातील मोटार चालू करण्यास जातो असे सांगून गेला होता. परंतु रात्री घरी आलाच नाही. शेतात जाऊन पाहिले असता त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसले. त्यानंतर त्यास खाली उतरवून घरच्यांनी पोलिसात कळविले.

पोलिसांनी पंचनामा करून बार्शी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. याबाबत बार्शी तालुका पोलीस ठाण्यात याची नोंद झाली आहे. या मुलाने एवढ्या कमी वयात आत्महत्येसारखे पाऊल उचलल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत. या मुलाने आत्महत्या का केली त्याचा तपास पोलीस करत आहेत.