कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून एकाने दारूच्या नशेत एकाच्या पोटावर चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना घडली. मंगळवारी रात्री १०:३०च्या सुमारास कराड शहरातील मंगळवार पेठेत घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी एकावर कराड शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनायक राजाराम पाटील (रा.मंगळवार पेठ कराड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. या हल्ल्यात विक्रम अशोक वेताळ (वय 35) रा. मंगळवार पेठ कराड) हा गंभीर जखमी झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विनायक पाटील व विक्रम वेताळ हे शेजारी-शेजारी राहत आहेत. त्यांच्या घराला सामायिक जिना असल्यामुळे त्यांच्यात पूर्वीच्या भांडणाचा वाद आहे. मंगळवार (दि.१८ रोजी) रात्री दहाच्या सुमारास विक्रम वेताळ हे आपल्या घराच्या टेरेसवर शतपावली करत होते. याचवेळी विनायक पाटील हे मित्रांसमवेत टेरेसवर दारूपीत बसले होते. त्यामुळे वेताळ हे शतपावली करून घरी झोपण्यास गेले होते. त्यानंतर रात्री १०:३०च्या सुमारास विनायक पाटील हे वेताळ यांच्या घरी येऊन ‘तू टेरेसवर कशाला आला होतास’ असे म्हणून दारूच्या नशेत शिवीगाळ करीत त्याने वेताळ यांच्या पोटावर वार केले. यात वेताळ हे गंभीररित्या जखमी झाले.
याप्रकरणी विनायक पाटील याच्यावर कराड शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हेड कॉन्स्टेबल सुनील पन्हाळे हे करीत आहेत.