बीड : हॅलो महाराष्ट्र – आज कालचे तरुण हिरोगिरी करण्यासाठी काय करतील याचा काही नेम नाही. हीच हिरोगिरी कधी कधी या तरुणांच्या अंगलट येते. असाच काहीसा प्रकार बीडमध्ये घडला आहे. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या दिवशी एक तरुण बाईकवर तलवार घेऊन फिरला होता. त्यानंतर बीड पोलिसांनी या तरुणावर कारवाई करून त्याला चांगलीच अद्दल घडवली आहे.
काय आहे नेमके प्रकरण ?
बीडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त काढलेल्या दुचाकी रॅलीत भररस्त्यात एका तरुणाने तलवार हातात घेऊन स्टंटबाजी केली होती. यानंतर या स्टंटबाजीचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. यानंतर बीड पोलिसांनी या फोटोवरून या तरुणाचा शोध घेऊन त्याला तुरुंगाची वारी घडवली आहे. गणेश उर्फ टिनू गोरख शिराळे असे या आरोपी तरुणाचे नाव आहे.
19 फेब्रुवारी शिवजयंती निमित्त काढलेल्या रॅलीत, गणेश शिराळे याने दुचाकीवर उभे राहून हातात तलवार घेऊन स्टंटबाजी करत हिरोगिरी केली होती. त्याच्या या स्टंटबाजीचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. तो तलवार जवळ बाळगून दहशत निर्माण करत असल्याची माहिती मिळाल्यावर एलसीबीचे पोलीस उपनिरीक्षक भगतसिंग दुल्लत यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी या आरोपी गणेशचा शोध घेऊन त्याला तुरुंगवारी घडवली आहे. याप्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये 3/25 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर या आरोपी तरुणाची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.