हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गुगलच्याच मालकीची कंपनी असणारी युट्युबने व्यवस्थापन आणि ऑपरेशन्स टीममधून 100 कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. ही घोषणा युट्युबचे चीफ बिझनेस ऑफिसर मेरी एलेन को यांनी केली आहे. युट्युबने घेतलेल्या या निर्णयामुळे एकूण 100 कर्मचाऱ्यांच्या हातातून आपल्या नोकऱ्या जाणार आहेत. तसेच, युट्युबमध्ये काही विविध पदांसाठी नव्या तरुणांची भरती देखील करण्यात येणार आहे.
मुख्य म्हणजे कपातीची घोषणा करत मेरी एलेन को यांनी कर्मचाऱ्यांना सांगितले आहे की, आम्ही काही नोकऱ्या कमी करण्याचा आणि काही कर्मचाऱ्यांना निरोप देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 100 कर्मचाऱ्यांच्या हातातून रोजगार जाणार आहे. तसेच दुसऱ्या बाजूला एका वृत्त संस्थेने माहिती दिली आहे की, युट्युबमध्ये जुन्या कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आल्यानंतर 100 प्रभावित कर्मचाऱ्यांची विविध पदासाठी भरती करण्यात येणार आहे.
या सगळ्यात सुंदर पिचाई यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या एका मेमोमध्ये म्हटले आहे की, आमच्यासमोर महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे आहेत. आम्ही या वर्षी आमच्या प्राधान्यक्रमांमध्ये गुंतवणूक करणार आहोत. येत्या काही काळापासून ज्या कठोर निर्णयाबद्दल बोलले जात आहे तो प्रत्यक्षात कर्मचारी कपातीशी संबंधित आहे. मात्र आगामी कर्मचारी कपात गेल्या वर्षीइतकी मोठी असणार नाही. आणि याचा टीमवर कोणताही परिणाम होणार नाही.
दरम्यान, गेल्या वर्षीच गुगलने सुमारे 12000 कर्मचाऱ्यांना कामाहून काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता. या कर्मचाऱ्यांमध्ये हार्डवेअर, जाहिरात, खरेदी, धोरण, अभियांत्रिकी आणि युट्युब कर्मचाऱ्यांचा देखील समावेश होता. मात्र आता गुगल कंपनीऐवजी युट्युब कर्मचाऱ्यांना कपातीचा फटका बसणार आहे.