औरंगाबाद | तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची 4 कोटींची देयके निधी अभावी धूळखात पडून असून ही देयके न मिळाल्यास देयके कालबाह्य होण्याची भीती शिक्षकांमध्ये निर्माण झाली आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळेवर सुमारे 1250 शिक्षक कार्यरत आहेत. यापैकी दोनशे ते अडीशे शिक्षक- शिक्षिका यांचे सन 2019 पासूनचे मेडिकल परिपूर्तीचे, अर्जित रजा, दीर्घ मुदतीच्या आजारी रजा, वेतन तफावत फरक देयके, चटोपाध्याय फरक देयके असे विविध प्रकारचे पुरवणी देयके बजेट अभावी पंचायत समितीला प्रलंबित आहे.
पुरवणी देयकासाठी आवश्यक निधीची मागणी शिक्षण विभागाने करूनही वरिष्ठ कार्यालयाकडून शासनाकडे पाठपुरावा करून बजेट प्राप्त करणे अपेक्षित असताना असे होताना दिसत नसल्याने देयके कालबाह्य होण्याची भीती शिक्षकांमध्ये झाली आहे, देयके कालबाह्य झाल्यास नव्याने जिल्हा परिषद सभेत मंजुरी घेऊन मुदत वाढ घ्यावी लागते. त्यानंतर त्यास लेखाधिकारी मंजुरी देतात याकामी अधिक विलंब लागतो.
त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने अन्य हेड मधून शिक्षकांच्या थकीत देयकांसाठी पंचायत समितीला निधी 31 मार्चपूर्वी उपलब्ध करून द्यावा व थकीत संपूर्ण देयके निकाली काढावीत, अशी मागणी आदर्श शिक्षक समितीकडून करण्यात आली आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group