हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Zapatlela 3) मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत गाजलेला चित्रपट ‘झपाटलेला’ आजही एव्हरग्रीन चित्रपटांपैकी एक आहे. एखाद्या वाहिनीवर हा चित्रपट लागला तर अनेक प्रेक्षक जागीच खिळून बसतात. या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच जादू केली आहे. जी अजूनही उतरलेली नाही. १९९३ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे, दिग्दर्शक – अभिनेता महेश कोठारे, ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या कसदार अभिनयामुळे हिट ठरला. या कलाकृतीचा सिक्वलदेखील आला होता. यानंतर आता पुन्हा एकदा तात्या विंचू प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाली आहे.
‘झपाटलेला – मी तात्या विंचू’ (Zapatlela 3)
‘झपाटलेला’ या अजरामर कलाकृतीचा २० वर्षानंतर २०१३ मध्ये ‘झपाटलेला – २’ नावाचा सिक्वल प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अभिनेता आदिनाथ कोठारे आणि सोनाली कुलकर्णी झळकली होती. या चित्रपटाला देखील प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली. यानंतर आता पुन्हा एकदा तात्या विंचू एका आगळ्या वेगळ्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे समजत आहे. याबाबत स्वतः आदिनाथ कोठारेने माहिती दिली आहे. आगामी चित्रपटाचे नाव ‘झपाटलेला – मी तात्या विंचू’ असे असून याचे पहिले पोस्टर देखील रिलीज करण्यात आले आहे.
आदिनाथ कोठारेची पोस्ट
अभिनेता आदिनाथ कोठारेने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर आगामी चित्रपट ‘झपाटलेला – मी तात्या विंचू’ (Zapatlela 3) याबाबतची पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने चित्रपटाचे पहिले पोस्टर शेअर केले आहे. हे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झाले असून चाहत्यांसाठी एक सुखद धक्का ठरले आहे.
या पोस्टरमध्ये तात्या विंचूचा अर्धा फोटो आणि आदिनाथ कोठारेचा अर्धा फोटो मर्ज केल्याचे पहायला मिळत आहे. या पोस्टारसोबत आदिनाथने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘हो हे खरं आहे. तात्या विंचू पुन्हा येतोय !!! २०२५ ला चित्रपटगृहात ! ओम फट स्वाहा !!!’
प्रेक्षकांमध्ये उत्सुकतेला उधाण
आदिनाथने शेअर केलेल्या या पोस्टवर अनेक कलाकार मंडळी तसेच प्रेक्षकांनी आनंदाने कमेंट केल्या आहे. अभिनेत्री मृणाल ठाकूर, वैभव तत्त्ववादी, ईशा केसकर, तेजस्वीनी लोणारी, जयवंत वाडकर, अभिनय बेर्डे, मंजिरी ओक, प्रियदर्शन जाधव या मराठी कलाविश्वातील कलाकारांनी कमेंट करत आदिनाथला चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
तर प्रेक्षकांनी (Zapatlela 3) या चित्रपटाबाबत विशेष उत्सुकता दर्शवली आहे. ‘मी हा चित्रपट जरूर पाहणार. पण या चित्रपटात मला दोघांची खूप आठवण येईल, ती म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे आणि विजय चव्हाण’, अशी कमेंट करत एका नेटकऱ्याने हरहुन्नरी कलाकारांची आठवण काढली आहे. तर काही नेटकऱ्यांनी आपण प्रतीक्षेत असल्याचे म्हटले आहे.