औरंगाबाद – राज्य मंत्रिमंडळाने काल राज्यातील जिल्हा परिषदांची संख्या वाढविण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील वाढलेली मतदार संख्या लक्षात घेता जिल्हा परिषदेचे आठ गट वाढण्याची शक्यता आहे. त्या तुलनेत पंचायत समितीचे 16 गण वाढतील त्यामुळे सदस्य संख्या 62 वरून 70 होऊ शकते. फेररचना झाल्यास आरक्षणाचे रोटेशन न होता उतरत्या क्रमाने गट, गण सुटतील असे राजकीय तर्कवितर्क सुरू आहेत.
मतदार वाढल्यामुळे गट गणांची संख्या वाढवण्यासाठी जिल्हा परिषद बांधकाम सभापती किशोर बलांडे यांनी ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना निवेदन दिले होते. सत्तार यांनी मागणी रेट्याने सदस्य संख्या वाढल्याचा दावा बलांडे यांनी केला आहे. औरंगाबाद, सिल्लोड, फुलंब्री, पैठण, गंगापूर तालुक्यात ही गट वाढण्याची शक्यता राजकीय नेते व्यक्त करत आहेत.
जिल्हा परिषदेत 1997-2002 मध्ये 58 सदस्य होते. 2002 मध्ये दोन गट वाढले. 2017 मध्ये औरंगाबाद आणि पैठण तालुक्यात प्रत्येकी एक गट वाढला तर प्रत्येकी दोन गण वाढले त्यामुळे सध्या जिल्ह्यात 62 गट व 120 गण आहेत.