हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोबाईल रिचार्जनंतर आता ऑनलाईन पद्धतीने जेवण खाणे सुद्धा महागले आहे. ऑनलाइन फूड डिलिव्हरी ॲप्स Zomato आणि Swiggy ने त्यांच्या दरात 20 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना पुन्हा एकदा धक्का बसला आहे. स्वतःच पोट भरणेही आता खिशाला परवडणार राहिलेलं नाही. परंतु हे वाढलेले शुल्क फक्त दिल्ली आणि बंगलोर या २ शहरातच पाहायला मिळेल. इतर ठिकाणी मात्र आधीचे शुल्कच लागू होतील.
कसे आहेत नवे शुल्क?
झोमॅटो आणि स्विगी वापरकर्त्यांकडून दिल्ली आणि बंगलोरमधील प्रत्येक ऑर्डरवर 6 रुपये प्लॅटफॉर्म शुल्क आकारले जाईल. यापूर्वी हेच शुल्क 5 रुपये होते. खरं तर या दोन दोन्ही लोकप्रिय ऑनलाइन फूड ऑर्डरिंग कंपन्यांनी मागील वर्षी प्लॅटफॉर्म फी सुरू केली होती. सुरुवातीला कंपन्यांनी फक्त प्रति ऑर्डर 2 रुपये शुल्क ठेवले होते मात्र वर्षभरातच टप्प्याटप्याने हा शुल्क त्यांनी 6 रुपयापर्यंत नेला आहे. फूड ऑर्डरिंग क्षेत्रावर झोमॅटो आणि स्वीगी या दोनच कंपन्यांचा वरचष्मा आहे. मार्केटमधील एकूण हिस्स्यांपैकी झोमॅटोचा वाटा 55 टक्के आहे तर स्विगीचा वाटा 44 टक्के आहे. म्हणजेच काय तर एकूण मार्केटपैकी या दोन्ही कंपन्यांचा वाटा 99 टक्के आहे.
यापूर्वी सुद्धा स्विगी आणि झोमॅटोने अनेक वेळा दर वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. जानेवारीच्या सुरुवातीला, स्विगी आणि झोमॅटोने निवडक वापरकर्त्यांसाठी प्लॅटफॉर्म शुल्क 10 रुपये वाढवले होते, जे 3 रुपयांपेक्षा खूप जास्त आहे. तथापि, वापरकर्त्यांकडून कधीही 10 रुपये आकारले गेले नाहीत. वापरकर्त्यांना 10 रुपये शुल्क दाखवण्यात आले होते, परंतु सवलतीनंतर 5 रुपये आकारण्यात आले. एप्रिलच्या सुरुवातीला, स्विगी आणि झोमॅटोने काही बाजारपेठांमध्ये प्रति ऑर्डर 4 रुपये ते 5 रुपये शुल्क वाढवले होते. त्यामुळे सातत्याने ग्राहकांच्या खिशाला झळ बसत आली आहे.