टीम हॅलो महाराष्ट्र : अजित दादा आणि उपमुख्यमंत्री पद हे समीकरणच रूढ झालेलं आहे. आघाडी सरकारच्या काळात काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत ते उपमुख्यमंत्री होते. मधल्या काळातील सत्ता नाट्यात त्यांनी भाजपचे नेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि आज अजित दादांनी शिवसेना प्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.
काँग्रेस, भाजप आणि शिवसेना या तिन्ही पक्षांच्या मुख्यमंत्र्यांसोबत अजित दादांना उपमुख्यमंत्री होण्याची संधी मिळाल्याने अजित दादांना सर्वपक्षीय उपमुख्यमंत्री होण्याचा अनोखा मान प्राप्त झाला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात अजित दादांच नाव कायमच चर्चेत राहील आहे. मधल्या काळातील राजकारणात तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदूच ठरले होते. भाजपसोबत जाण्याच्या त्यांच्या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला होता. भाजपसोबत जाऊन ते चार दिवसाचे उपमुख्यमंत्री झाले आणि पुन्हा स्वपक्षात परतले. आता ते पु न्हा उपमुख्यमंत्री पदी विराजमान झाले आहेत.