मुंबई प्रतिनिधी | महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी घडत असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तास्थापनेसाठी पाठिंबा द्यावा, अशी मागणी करण्यासाठी ही भेट असल्याचे समजते.
भाजपने सत्ता स्थापन करण्यास असमर्थता दर्शवल्यानंतर राज्यपालांना शिवसेनेला निमंत्रित केले आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात फोनवरून चर्चा झाली असल्याची माहिती आहे.यावेळी शरद पवारांनी उद्धव यांचे अभिनंदन केले आहे. तसेच आता उद्धव ठाकरे पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
राज्यपालांनी शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी आमंत्रित केल्यानंतर प्रतिसाद देण्यासाठी 24 तासांचा अवधी दिला आहे. यातच शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन सरकार स्थापन करणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान शिवसेनेनं आधी एनडीएतून बाहेर पडावं. तसेच त्यानंतर सत्तास्थापनेसाठी आमच्याकडे प्रस्ताव द्यावा. त्यानंतर याबाबत पक्षाकडून विचार केला जाईल, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटले आहे.