सोलापूर प्रतिनिधी। वंचित बहुजन आघाडी कडून एमआयएम पक्षाला सन्मानपूर्वक वागणूक मिळाली नाही तसेच विधानसभेसाठी आठच जागांची ऑफर दिल्याचे सांगत एमआयएम चे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी युती तुटल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर तातडीने त्याने ११ सप्टेंबर ला उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यानंतर मधील काळात पुन्हा युती होणार की, काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. कारण असुदद्दीन ओवेसी, प्रकाश आंबेडकर आणि जलील यांच्या वक्तव्यावरून तासा अंदाज व्यक्त केला जात होता.
आंबेडकर म्हणत होते युतीसाठी आमचे दार खुली आहेत, तर जलील म्हणत होते पुन्हा चर्चा केली तर युती होऊ शकते. परंतु आता रविवारी एमआयएम ने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केल्याने युती बाबत अशा मावळल्या आहेत.
दरम्यान जलील यांनी 11 सप्टेंबरला जाहिर केलेल्या यादीमध्ये पुण्यातील वडगाव शेरी, नांदेड उत्तर आणि मालेगाव मध्य मतदारसंघांचा समावेश होता. तर दुसऱ्या यादीमध्ये सांगोला, सोलापूर मध्य, सोलापूर दक्षिण आणि पुणे कॅन्टोन्मेंट या चार मतदारसंघांचा समावेश आहे. सांगोल्यातून शंकर सरगर, सोलापूर मध्यमध्ये फारूक शाब्दी, सोलापूर दक्षिणमध्ये सुफिया शेख आणि पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून हिना मोमीन यांना उमेदवारी देण्यात आली आहे. जलील यांनी जाहीर केलेल्या उमेद्वारांमुळे वंचितसमोर मोठ आव्हान निर्माण झाले असल्याची चर्चा आहे.