कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू केली आहे. लोकांच्या जीवापोटी सरकारने जाहीर केलेल्या संचारबंदीत शहरांपेक्षा ग्रामीण भागातील गावात जास्त जागरूकता आणि जबाबदारी पाहायला मिळत आहे. एकीकडे शहरात अनेकजण आपली वाहने घेऊन रस्त्यावर फिरत असल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे गावाकडे लोक खूपच काळजी घेत आहेत. संचारबंदीत कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी ५ पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये अशा सूचना सरकारने दिल्या आहेत. परंतु, काही केल्या शहरातील काही लोक संचारबंदी पाळायला तयार नाही आहेत. या तुलनेत कोल्हापुरातील एका गावानं करोनाशी मुकाबला करण्यासाठी गांभीर्यानं जबाबदारी ओळखत चोख तयारी केली आहे.
पन्हाळा तालुक्यातील वाघवे गावातील नागरिकांनी गावातील सर्व मुख्य रस्ते बंद केले आहेत. त्यामुळं कोणीही गावात येऊ शकत नाही आणि गावातून बाहेर कोणीही जाऊ शकत नाहीय. इतकेच नव्हे गावाच्या पारावर सायंकाळी लोक गप्पा करण्यासाठी एकत्र येऊ नये. म्हणून बसायच्या बाकड्यांवर आणि पारावर काळे ऑइल टाकण्यात आले आहे. शहरी भागाच्या तुलनेत गाव पातळीवर कोरोनाबाबत आता अधिकच जागृती दिसत असून लोकांनी करोनाला गांभीर्याने घ्यायला सुरुवात केली आहे.
दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.




