गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ

CM Devendra Fadanvis
CM Devendra Fadanvis
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । सतिश शिंदे

गोवर-रुबेलासारख्या घातक आजारांपासून महाराष्ट्राला मुक्त करण्यासाठी सामान्य नागरिकांनी लसीकरणामध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा आणि मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे केले.

विधानभवनाच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात गोवर-रुबेला प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विधानपरिषद सभापती राजराजे नाईक-निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, पर्यावरणमंत्री रामदास कदम, शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्व. उपक्रम) एकनाथ शिंदे, मुंबईचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई, आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी लसीकरण करण्यात आलेल्या १४ बालकांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, “गोवर आणि रुबेला आजारामुळे देशात दरवर्षी हजारो बालके मुत्युमुखी पडतात. आपल्या बालकांमधील प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी लसीकरण आवश्यक असून युवा पिढी सुदृढ व्हावी यासाठी पालकांनी लसीकरण मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून आपल्या मुलांना लस द्यावी.” ही मोहीम सार्वजनिक आरोग्य विभाग, नगरविकास विभाग, महिला व बालकल्याण विभाग, आदिवासी विकास विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग आदी विभागांच्या समन्वयातून सुरु करण्यात आली आहे. प्रत्येक विभागाने आपले योगदान देऊन मोहीम यशस्वी करावी असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. या मोहिमेचे यशस्वी नियोजन केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आरोग्यमंत्री तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी यांचे अभिनंदन करीत लसीकरण केलेल्या बालकांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

“केंद्र शासनाच्या सहाय्याने गोवर रुबेला लसीकरण हा महत्वाकांक्षी प्रकल्प आपण शहरी व ग्रामीण भागात सुरू केला आहे. ९ महिने ते १५ वर्षाखालील याअंतर्गत सुमारे ३ कोटी ३८ लक्ष बालकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ही लस सुरक्षित आहे. तसेच यापूर्वी ही लस घेतली असल्यासदेखील या मोहिमेत लस टोचून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत. सध्या ही मोहीम 20 राज्यांमध्ये राबविली जात असून प्रथम शिक्षकांनी व पालकांनी कर्तव्यदक्ष आणि जागरूक होऊन बालकांचे लसीकरण झाले असल्याची खात्री करावी असे आरोग्यमंत्री या वेळी म्हणाले.

राज्यात सर्वत्र सरकारी, खासगी शाळांमध्ये, अंगणवाडी, सरकारी दवाखाने, आरोग्य उपकेंद्रे यांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. गोवरचे उच्चाटन व रुबेला वर नियंत्रण असे २०२० पर्यंतचे लक्ष्य समोर ठेऊन ही राज्यव्यापी मोहीम सुरु करण्याचा निर्णय आरोग्यमंत्र्यांनी घेतला आहे.