‘जेल’ मधून येणार कोल्हापूरच्या अंबाबाईचा लाडू प्रसाद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । (स्पेशल रिपोर्ट)

साडेतीन शक्तीपीठांपैकी एक महत्वाचे असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई या देवस्थानची जगभर ओळख आहे. ‘नवरात्र उत्सव’ म्हटलं की इथे महाराष्ट्रातूनच नव्हे तर जगभरातून लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. येत्या रविवारपासून नवरात्रौत्सवास प्रारंभ होत आहे. या निमित्त देवस्थान समिती आणि श्री पूजकांची त्यांच्या पातळीवर तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना लाडू प्रसाद पुरविणाऱ्या कळंबा कारागृहातही उत्सवासाठीची लगबग सुरू आहे. नकळत घडलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगणारे अनेकजण असतात. मात्र त्यांना माणूस बनून जगण्याचा अधिकार शिक्षा भोगत असताना कळंबा जेल प्रशासनाने दिला आहे. त्याचाच भाग म्हणून बंदीजनाच्या हातांना वेगवेगळे काम या कारागृहात दिले जाते. अशाच एका कामाची सध्या लगबग कारागृहात सुरू आहे. अंबाबाई मंदिरातील लाखो लाडूंची ऑर्डर यावेळी कारागृहाला मिळाली असून शेकडो बंदीजन यासाठी अहोरात्र काम करत आहेत. याच बंदीजनच्या हातांनी तयार झालेला लाडू प्रसाद नवरात्र काळात भाविकांना देवस्थान समितीच्या वतीने देण्यात येणार आहे. यावर्षी 2 लाख लाडूंची ऑर्डर ‘कळंबा जेल’ला मिळाली असून याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

याबाबत अधिक माहिती देताना कळंबा कारागृह अधीक्षक शरद शेळके सांगतात की, ‘देवस्थान समितीकडून रोज १० ते १५ हजार लाडूंची आर्डर येते. त्यामुळे सध्या लाडूसाठीच्या कळ्या पाडण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी ४० महिला कैदी आणि ६० पुरूष कैदी काम करत आहेत. सध्या सकाळी आठ ते दुपारी चार या एका शिफ्टमध्ये हे काम मात्र दोन शिफ्टमध्ये चालते. सुमारे 3 वर्षांपासून हा उपक्रम सुरू असून आतापर्यंत 31 लाख लाडू कारागृहाने अंबाबाई मंदिरात पुरवले असून दोन कोटी 90 लाखांचे उत्पन्न कारगृहाला झाले आहे.’

ते पुढे म्हणाले की, ‘हे लाडू तयार करत असताना त्यांच्या क्वालिटी बाबत कोणतीही तडजोड केली जात नाही. स्वच्छ वातावरणात आणि बंदीजनाकडून स्वच्छतेची काळजी घेऊन ते करून घेतले जातात.’ तेव्हा कळंबा जेल मधील शेकडो बंदीजनांचे अंबाबाईच्या सेवेसाठी राबलेल्या हातानी बनवलेले हे चविष्ट झालेले हे लाडू भाविकांना आकर्षित करणारे ठरत आहेत यात दुमत नाही.

Leave a Comment