निवडणुका जाहीर होताच सांगलीत राजकीय हालचाली झाल्या गतिमान

प्रातिनिधिक छायाचित्र
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी। प्रथमेश गोंधळे

राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्याने जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. जिल्ह्यातील आठ मतदारसंघांपैकी चार जागा भाजपकडे, दोन राष्ट्रवादीकडे तर कॉंग्रेस व शिवसेनेकडे प्रत्येकी एक जागा आहे. जिल्हा कॉंग्रेसमुक्त करण्याचा विडा भाजपने उचलला आहे. तर कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीपुढे जागा वाढविण्याचे आव्हान असणार आहे.

या निवडणुकीत जिल्ह्यात पक्ष वाढीसाठी भाजपचे मंत्री ना.सुरेश खाडे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील व कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष आ.विश्वजीत कदम यांचा कस लागणार आहे. राज्यातील विधानसभा निवडणुका २१ ऑक्टोंबरला होणार आहे. या निवडणुकीची घोषणा आज करण्यात आली. अर्ज दाखल करण्यासाठी २७ सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे.

जिल्ह्यात सांगली, मिरज, तासगाव-कवठेमहांकाळ, जत, खानापूर-आटपाडी, पलूस-कडेगाव, शिराळा व इस्लामपूर हे आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात भाजपची ताकद वाढत चालली आहे. लोकसभेत खासदार संजयकाका पाटील विजयी झाल्यानंतर भाजपचे जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महापालिका तसेच अनेक ग्रामपंचायतींवर भाजपने आपला झेंडा फडकवला होता. या निवडणुकीत मिरज विधानसभेचे नामदार सुरेश खाडे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील व कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष आ.विश्वजीत कदम यांना पक्ष वाढीसाठी जिल्ह्यात प्रयत्न करावे लागणार आहे. त्यामुळे या नेत्यांचा कस लागणार आहे. जिल्ह्यातील सर्व मतदारसंघात रंगदार लढती होणार आहेत.