न्यायालय स्थलांतरविरोधात मिरजकर रस्त्यावर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे

मिरज न्यायालय सांगलीतील राजवाडा चौकातील जुन्या न्यायालयाच्या इमारतीत स्थलांतराला मिरजेतील राजकीय व सामाजिक संघटनांनी सर्व पक्षीय मिरज न्यायालय बचाव कृती समितीच्या माध्यमातून तीव्र विरोध करत महाराणा प्रताप चौकात बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.

मिरज किल्ला भागामध्ये संस्थाकालिन इमारतीमध्ये न्यायालयाचा कारभार चालत असे. मिरज न्यायालयाची इमारत जीर्ण होऊन धोकादायक झाल्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मिरज न्यायालय सांगलीतील राजवाडा चौकातील जुन्या न्यायालयाच्या इमारतीमध्ये स्थलांतर केले आहे. संस्थाकालिन असलेली राजवाडा चौकातील न्यायालयाची इमारत महापुरात सलग आठवडाभर पुराच्या पाण्यात असल्याने इमारत जीर्ण होऊन धोकादायक बनली आहे. अशा ठिकाणीच न्यायालय नेल्याने पक्षकारांसह वकिलांचा जीव धोक्यात येणार नाही का? असा सवाल उपस्थित झाला आहे.

शिवाय, सध्याचे मिरज न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात मिरज पूर्व भागातील मिरज शहरापासून ४५ किमी अंतरावर असलेल्या सलगरे, लिंगनूर, खटाव, संतोषवाडी आदी गावांसह सुमारे 49 हून अधिक गावांचा समावेश आहे. या भागातील पक्षकारांना मिरजेलाच येईंपर्यंत नाकीनऊ येते. आता पुन्हा मिरजेतून थेट १५ किमी अंतरावर सांगलीतील राजवाडा चौकात जावे लागत आहे. पक्षकारांबरोबरच वकिलांची सुध्दा मोठी गैरसोय होत आहे. याच्या निषेधार्थ आज पासून सर्वपक्षीय आंदोलन सुरू केले आहे.