परभणी प्रतिनिधी| गजानन घुंबरे
परभणी जिल्ह्यामध्ये चारही विधानसभेच्या जागेसाठी राजकीय पक्षांकडून तिकीट वाटपामध्ये अनपेक्षित उलटापालट झाली असून जवळपास सर्वच मतदारसंघांमध्ये राजकीय बंडखोरांच्या ‘इंट्री’मुळे बहुरंगी निवडणूक लढती होणार आहेत. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात यावेळी महायुतीच्या मित्रपक्षांनी घुसखोरी केल्याने सेनेचे पाथरी आणि जिंतूर बालेकिल्ले मात्र लढती पूर्वीच ढासळले आहेत. महायुतीच्या जागा वाटपामुळे शिवसेनेची स्वतःच्या घरात चांगलीच गोची झाली आहे. पाथरी विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला होता. पाथरीमधून भाजपाचे तिकीट मिळवण्यासाठी विद्यमान आमदार मोहन फड आग्रही होते. शेवटी मोहन फड यांना महायुतीकडून तिकीट मिळाले पण यावेळी त्यांना रिपाई च्या चिन्हावर लढावं लागणार आहे. मोहन फड हे मागील वेळी अपक्ष म्हणून निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी शिवसेना, भाजप व आता रिपाई असा राजकीय प्रवास केला. मात्र फड यांच्या उमेदवारीमुळे शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी या निर्णयाने संतापले असून शिवसेनेकडून इच्छुक डॉक्टर जगदीश शिंदे हे शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत अशी माहिती मिळत आहे.
जिंतूर विधानसभा मतदारसंघातही भाजपकडून संपूर्ण तयारी केलेल्या मेघना बोर्डीकर यांना ऐनवेळी महायुतीतील रासप कडून उमेदवारी देण्यात आली आहे. या ठिकाणीही शिवसेना दावेदार होती. शिवसेनेकडून राम खराबे यांनी मागील अनेक दिवसांपासून जिंतूरसाठी उमेदवारी मिळावी म्हणून तयारी केली होती. परंतु बोर्डीकर यांना उमेदवारी मिळाल्याने त्यांच्या पदरी निराशा पडली.
खरं तर भाजपने पाथरी आणि जिंतूर या दोन्ही विधानसभा जागांवर भाजपकडून निवडणूक लढण्यासाठी इच्छुकांना मित्रपक्षांतर्फे उमेदवारी देत चांगलीच राजकीय खेळी केली. भाजपच्या या खेळीने निवडणुकीपूर्वीच शिवसेनेच्या दोन्ही जागा खालसा झाल्या आहेत. महायुतीत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना गृहीत धरत तसेच जागावाटपा दरम्यान दगाफटका झाल्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. यावेळी परभणी मधून विद्यमान आमदार राहुल पाटील यांना शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. तर गंगाखेड विधानसभेकरिता विशाल कदम यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली आहे
जिल्ह्यामध्ये आघाडीकडून परभणी व पाथरी विधानसभा काँग्रेससाठी सोडण्यात आली आहे तर जिंतूर व गंगाखेड राष्ट्रवादी काँग्रेस लढत आहे. पाथरी मधून काँग्रेसचे सुरेश वरपूडकर उमेदवार आहेत.तर परभणी मध्ये सुरेश नागरे यांचे नाव काँग्रेसकडून सर्वात पुढे होते परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांचा नागरे यांच्या उमेदवारीला प्रखर विरोध होता. त्यामुळे ऐनवेळी खांदेपालट होत काँग्रेसकडून रविराज देशमुख यांना उमेदवारी घोषित झाले आहे. जिंतूर मधून राष्ट्रवादी पक्षाकडून आमदार विजय भांबळे तर गंगाखेड मधून आमदार मधुसूदन केंद्रे यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडी कडून परभणी मध्ये शेख मोहम्मद गौस, पाथरी-मधू विलास बाबर, गंगाखेड- करूणा बाळासाहेब कुंडगीर व जिंतूर मधून मनोहर वाकळे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे आता जिल्ह्यात राजकीय पक्षांमध्ये बहुरंगी लढत पाहायला मिळणार आहे.