प्रथमेश गोंधळे, सांगली – शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी पत्रकार परिषद घेऊन भीमा कोरेगाव प्रकरणावर भाष्य केले. भीमा कोरेगाव प्रकरणी माझा कोणताही संबंध नाही. त्यादिवशी मी इस्लामपूर मध्ये मंत्री जयंत पाटील यांच्या सांत्वनासाठी गेलो होतो, या प्रकरणात निष्कारण मला गोवले आहे. या मागे दुष्टबुद्धी बारामती की तेरामतीची आहे हे मला माहित नाही,या भाषेत त्यांनी शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीका केली. मात्र पुणे जिल्हा बंदीची नोटीस मला अद्याप मिळाली नसल्याचे त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
CAA च्या समर्थनार्थ शिवप्रतिष्ठानचा ३० डिसेंबर रोजी मोर्चा
नागरिकत्व सुधारणा कायदा ( सी.ए.ए ) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी कायद्याच्या समर्थनार्थ शिवप्रतिष्ठानच्यावतीने ३० डिसेंबर रोजी सांगलीमध्ये भव्य असा मोर्चा काढण्यात येणार आहे. याची माहिती देण्यासाठी संभाजी भिडे यांनी सांगलीत पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत भिडेंनी पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.
यावेळी संभाजी भिडेंना कोरेगाव-भीमा येथे १ जानेवारी रोजी होणाऱ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा बंदी केल्याबद्दल विचारले असता ते म्हणाले, कोरेगाव-भीमा दंगलीशी माझा कसलाही संबंध नाही. मी तेथे गेलोच नाही, या प्रकरणातून मला निष्कारण बदनाम करण्याचा कट आखला जात आहे. जिल्हा बंदी बाबत मला कोणतीही नोटीस प्रशासनाकडून मिळाली नाही. जाणीव पूर्वक मला या मध्ये बदनाम केले जात आहे. यामागे दुष्टबुद्धी कार्यरत असून ती बारामती कि तेरामती याचा शोध बुद्धिवान लोकांनी घ्यावा असे म्हणत भिडेंनी भीमा-कोरेगाव प्रकरणी पहिल्यांदाच थेट शरद पवारांना लक्ष केले.