सांगली प्रतिनिधी। अंबक फाटा सोनहीरा कारखाना चौक येथील बुरुंगले कुटुंबात जागेच्या वाटणीवरून घरगुती वादातून नायलॉनच्या दोरीने गळा आवळून खून करणाऱ्या सख्या भावास व त्याच्या साथीदारास चिंचणी पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे खून केल्यानंतर आरोपींनी अपघाताचा बनाव रचला होता. हा प्रकार शुक्रवार दिनांक २० सप्टेंबर रोजी रामापूर फाटा जवळ रात्री बाराच्या सुमारास घडला होता.
शिवाजी बुरुंगले असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी मयत शिवाजी याचा भाऊ शंकर बुरुंगले, काशीलिंग मोहिते राहणार वांगी तालुका कडेगाव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी चिंचणी वांगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. २० सप्टेंबर रोजी रात्री शिवाजी बुरुंगले हा कडेगाव वरून अंबक फाटाकडे दुचाकीवरून येत होता. यावेळी कडेगाव तडसर रस्त्याला विक्रमनगर जवळ शिवाजी हा आला असताना पाठीमागून दुचाकीवरून पाठलाग करत आलेला त्याचा भाऊ शंकर याने लोखंडी रॉड शिवाजी याच्या डोक्यात मारहाण केली व पळून गेला. यानंतर शंकर याने पुन्हा कडेगाव येथील खाजगी रुग्णालयात येऊन अपघाताचा बनाव करून शिवाजी पुढील उपचारासाठी सांगलीला नेणार असल्याचे सांगितले डॉक्टरांना सांगितले. सांगलीला जाताना रामापूर फाट्याजवळ पोहचल्यावर शंकर याने काशीलिंगच्या मदतीने नायलॉनच्या दोरीने शिवाजी याचा गळा आवळला.
यानंतरही अपघाताचा बनाव करून शिवाजी यास पुढे सांगली येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी घेऊन नेले. परंतु तेथील डॉक्टरांनी शिवाजी हा मृत झाल्याचे घोषित केले. आरोपींनी खून करूनही अपघात झाल्याचा बनाव केला. चिंचणी वांगी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष गोसावी यांच्यासह पथकाने संशययीत आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.