बुलडाणा प्रतिनिधी। विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे राज्यात राजकीय खलबतांनी जोर पकडला आहे. जो तो आपली जागा शाबूत ठेवण्याच्या प्रयत्नात असून विचारधारा पक्षनिष्ठा या सगळ्यांना फाट्यावर मारत अनेक नेते भाजप सेनेत प्रवेश करत आहेत. या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या इनकमिंग मुळे निष्ठावंत मात्र यामुळे आपल्यावर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त करत आहेत. अशाच प्रकारची नाराजी बुलडाणा जिल्हा भाजपमध्ये पाहायला मिळत आहे. आयारामांमुळे संतापाची भावना त्यांच्यात पसरली आहे.
बुलडाणा जिल्ह्यात असेच काहीसे चित्र पाहायला मिळत आहे. चिखली येथील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तसेच विद्यमान आमदार राहुल बोन्द्रे भाजपा मध्ये प्रवेश करीत असल्याची चर्चा गेल्या बऱ्याच दिवसापासून सुरु आहे. आज न उद्या ते भाजप प्रवेश करतील याची दाट शक्यता असताना स्थानिक भाजप कार्यकर्त्यां मध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. राहुल बोन्द्रे यांच्या भाजपा प्रवेश निश्चितीची चाहूल लागताच त्यांच्या पक्ष प्रवेशाबाबत विरोधात भाजपा कार्यकर्त्यांनी चिखली येथे बैठा सत्याग्रह सुरु केला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर इतर पक्षातील नाराज प्रस्थापित पुढाऱ्यांना भाजप सढळ हाताने भाजपात सामावून घेत आहे. त्याच धर्तीवर चिखली येथील काँग्रेस आमदार राहुल बोन्द्रे भाजपा प्रवेश निश्चित दिसत असताना स्थानिक भाजप कार्यकर्त्यांचा रोष तीव्र होताना दिसत आहे. आता या रोषाची दखल जिल्हा भाजप कमिटी किती घेते याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे.