जालना प्रतिनिधी | सध्या विधानसभा निवडणूका जवळ आलेल्या असताना राज्यभर राजकीय पक्षांच्या यात्रांमध्ये राजकीय नेते आरोप प्रत्यारोपांच्या एकमेकांवर फैरी झाडात आहेत. दरम्यान भाजपने काढलेल्या महाजनादेश यात्रेतील आपल्या जालना जिल्ह्यातील भेटीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर चांगलेच तोंडसुख घेतले आहे.
‘सध्या राज्यात निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने वेगवेगळ्या यात्रा काढल्या आहेत. पण या यात्रांना जनतेकडून प्रतिसाद मिळत नसून विरोधकांच्या सभेतील गर्दीने मंगल कार्यालय देखील भरत नसल्याचा’ टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावला आहे. आज जालना जिल्ह्यातील अंबड येथे भाजपची महाजनादेश यात्रा पोहचली. आयोजित सभेत मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्र्यांच्या सभेला हजारोंच्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती लावलेली दिसली. या प्रतिसादाचं कौतुक करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या यात्रांवर निशाणा साधला.
लोकसभेच्या निवडणुकांमध्ये भाजपला मिळालेल्या मोठ्या यशानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ‘महाजनादेश’ यात्रेचे आयोजन केले. दरम्यान पश्चिम महाराष्ट्रामध्ये आलेल्या प्रचंड मोठ्या महापुरामुळे मुख्यमंत्र्यांना यात्रा काही काळासाठी स्थगित करावी लागली. मात्र पूर परिस्थिती सावरल्यानांतर मुख्यमंत्र्यांचा महाजानदेश यात्रेला पुन्हा सुरुवात झाली आहे.