सेनेशी युती करा ; तडजोड नाही – ‘मोदी’ आदेश

प्रातिनिधिक छायाचित्र
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम, HELLO महाराष्ट्र | ‘महाराष्ट्रात शिवसेनेशी युती करायची आहे, तडजोड नाही,’ अशा स्पष्ट शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सूचना दिल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले आहे. त्यानुसार भाजपने तडजोड न करण्याचा पवित्रा घेतला तर युतीचे भवितव्य काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या पार्श्वभूमीवर युतीबाबत पुढील आठवड्यात निर्णय होण्याची शक्यताही सूत्रांनी वर्तविली आहे. दरम्यान, दोन्हीही पक्षांमध्ये जोरदार ‘इनकमिंग’ सुरू असल्याने युती होणार की नाही, याबाबत राज्यभरात खमंग चर्चा सुरू झाल्या आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकीत युतीची बोलणी अद्याप जाहिररीत्या सुरू झाली नसली, तरी ‘वर्षा’ आणि ‘मातोश्री’वर खलबते सुरू आहेत. त्यातच महाराष्ट्रात एक हाती सत्ता आणण्याचा भाजपचा यावेळी निकराचा प्रयत्न सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेनेची युती केली, तरीही त्यातून भाजप पावणे दोनशे ते दोनशे जागा लढविण्यास इच्छुक आहे. त्यामुळे शिवसेनेशी युती करायची असली, तरी त्यांच्याशी तडजोड करायची नाही, अशी भूमिका केंद्रातील ज्येष्ठ नेत्यांनी घेतल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

त्याचप्रमाणे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नुकतेच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना त्यांनी राज्यातील ज्येष्ठ नेत्यांना हेच बजावले असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. युती झाल्यास भाजपने या निवडणुकीत लढविलेल्या जागांपैकी ८० टक्के जागा जिंकून आणण्यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी सुरू केली आहे. गेल्या काही महिन्यांतील भाजपच्या घडामोडी पाहता पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे