महाराष्ट्रात येणारा 1. 54 लाख कोटींचा प्रकल्प गुजरातला : आदित्य ठाकरे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | वेदांत आणि फॉसकॉनच्या सेमी कंडक्टरच्या प्रकल्पाच्या विषयाची तीन वर्षांपूर्वी चर्चा झाली होती. वेदांत हा प्रकल्प मुंबईत येणार अशी घोषणा करण्यात आली होती. घोषणेनंतर काही झाले नव्हते. गेल्या वर्षी दावोसला वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्या बैठकीसाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई हे गेलेले असताना, आदित्य ठाकरे आणि देसाई यांनी वेदांतचे प्रमुख अनिल अग्रवाल यांच्याशी चर्चा केली होती. महाराष्ट्रात येणारा 1. 54 लाख कोटींचा प्रकल्प गुजरातला गेल्याची माहिती समोर आल्याचे युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

आदित्य ठाकरे म्हणाले, या उद्योगासाठी तळेगाव हे ठिकाणही ठरवण्यात आले होते. त्यानंतर कागदपत्र करण्याचे काम राहिले होते. मात्र, नंतर सरकार बदलले. नंतर काही काळ काही झाले नव्हते. त्यानंतर अचानक हा प्रकल्प राज्यातून गुजरातला गेला, हे धक्कादायक आहे. सध्याचे सरकार हे स्वताःसाठी खोके अन् महाराष्ट्रासाठी धोके असे आहे.

अनिल अग्रवाल यांनी ट्विट करुन हा प्रकल्प गुजरातमध्ये नेणार असल्याचे सांगितले. हे प्रकल्प दुसऱ्या राज्यात जाण्याचे दुख नाही. पण ही कंपनी 95 टक्के राज्यात येणार होती. पण अचानक ती गुजरातला का गेली असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. हा प्रकल्प सुमारे पावणे दोन लाख कोटींचा होता, असेहीत्यांनी सांगितले आहे. याच्याशी संबंधित 160 इंडस्ट्री राज्यात येणार होत्या. त्यातून 70 हजार रोजगार निर्मिती होणार होती, असेही त्यांनी सांगितले आहे. गुजरात सरकारच्या उद्योगमंत्र्यांनी यासाठी प्रयत्न केले, त्यांचे अभिनंदन पण मग राज्यात जी यंत्रणा होती, तिने यात का काही केले नाही, असा सवालही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.