पुणे प्रतिनिधी। ‘जागतिक एड्स दिना निमित्त’ कैवल्यधाम आरोग्य व योग संशोधन केंद्राच्या वतीने, ममता फाऊंडेशन संस्थेतील एड्सबाधित मुला-मुलींसाठीसाठी एका मनोरंजनात्मक तसेच उर्जापूर्ण योग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
संस्थेतील सात ते अठरा या वयोगटातील मुलं-मुली, तसेच सर्व कर्मचारी या उपक्रमात सहभागी झाले होते. कैवल्यधामच्या या योग कार्यशाळेला या एड्सबाधित मुलांनी सकारात्मक व उत्साही प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळाले. संपूर्ण कार्यशाळेत भाग घेत त्यांनी आनंदाने विविध योगासनांची माहिती करून घेतली. ही सर्व योगासने व प्राणायमाचे विविध प्रकार निसर्गाशी संबंधित असेच होते.
आपल्या दैनंदिन जगण्यात एक सकारात्मकता आणणे व तणावमुक्त वातावरणाची निर्मिती करून आनंदाने जगणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. पुणेस्थित ‘ममता फाऊंडेशन’ ही संस्था एचआयव्हीबाधित मुले व महिलांसाठी एक सेवाभावी प्रकल्प चालवते. एड्स बाधित मुलांच्या व महिलांच्या पुनर्वसनासाठी तसेच त्यांच्या कल्याणासाठी विविध उपक्रम व प्रकल्प या संस्थेत वारंवार राबवले जातात.
‘कैवल्यधाम आरोग्य व योग संशोधन केंद्रा’ची स्थापना स्वामी कुवलयानंद यांनी १९२४ मध्ये लोणावळा येथे केली होती. या केंद्रात आध्यात्मिक, उपचारात्मक आणि संशोधनात्मक केंद्रे असून प्राचीन योग ज्ञान व आधुनिक विज्ञान यांचा मेळ घालून मानवी जीवन सुकर करण्यावर येथे भर देण्यात येतो.