औरंगाबाद । एमआयडीसी वाळूज येथील एका कंपनीला दक्षिण कोरियातून खोटा मेल पाठवून अठरा लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याप्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबर गुन्हेगाराने कंपनीला खोटा मेल पाठवून त्यात दिलेल्या बँक खात्यावर १८ लाख २८ हजार ३१७ रुपये मागवून कंपनीची फसवणूक केली आहे.
याबाबत माहिती अशी की, विनायक शंकरराव देवळाणकर यांची मनू इलेक्ट्रीकल नावाने कंपनी आहे. त्यांना लागणार कच्चा माल ते परदेशातून मागवतात. यासाठी ते दक्षिण कोरिया येथील एका कंपनीसोबत सप्टेंबर २०२० पासून व्यवहार करतात. यासाठी त्या कंपनीचे औरंगाबाद येथे राहणारे प्रतिनिधी के. एल. जंग यांच्या माध्यमातून त्या कंपनीच्या संपर्कात होते. साहित्य खरेदी करण्यासाठी देवळाणकर कंपनीसोबत मेल वरून व्यवहार करायचे त्याबाबत सर्व माहिती मेलवरच मिळायची. त्यांनी कोरियातील कंपनीला साहित्य खरेदीसाठी मेल पाठवला होता, त्या वेळी त्यांनी अगोदर पैसे पाठवा; नंतर साहित्य मिळेल, असा मेल पाठवला होता. त्यावेळी त्यांना एक मेल आला त्यात कंपनीचे नाव व कोरिया येथील बँक खाते नंबर पाठवला होता. त्यामुळे देवळाणकर यांनी त्यांच्या खात्यातून मेलवर प्राप्त झालेल्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी बँकेला अर्ज करून व कागदपत्रांची पूर्तता केली होती. त्या वेळी बँकेतून २३ ऑक्टोबर रोजी १८ लाख २८ हजार ३१७ रुपये डॉलरमध्ये २४ हजार ५६७.७२ डॉलर एवढी रक्कम दिलेल्या खात्यावर पाठवली होती.
त्यानंतर दोन दिवसानी के. एल. जंग यांच्याशी फोनवरून संपर्क करून साहित्य पाठवण्याबाबत विचारले असता त्यांनी तुमचे पेमेंट कंपनीला पोहचले किंवा नाही याची खात्री करतो व तुमचा माल पाठवायला सांगतो, असे सांगितले. तर त्या कंपनीने पैसे मिळाले नसल्याचे सांगितले. पैशांसाठी पाठवण्यात आलेला मेलही पाठवण्यात आला नाही आणि बँक खाते कंपनीचे नसल्याचा खुलासाही करण्यात आला. त्यामुळे ऑनलाइन फसवणूक झाल्याचे देवळणाकर यांच्या लक्षात आले. त्यांनी २९ ऑक्टोबर रोजी सायबर शाखेला तक्रार दिली. या प्रकरणी देवळाणकर यांच्या फिर्यादीवरून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर गुन्हेगाराविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक पोतदार पुढील तपास करत आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Grou