पोलीस ठाण्याबाहेरच दोन गटात तुफान राडा; दगडफेक करत एकमेकांची फोडली डोकी

नांदगाव : हॅलो महाराष्ट्र – नाशिक जिल्ह्यातील नांदगाव शहरात दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. किरकोळ कारणातून सुरू झालेला हा वाद विकोपाला गेला आहे. या दोन्ही गटांनी नांदगाव पोलीस ठाण्याच्या बाहेरच एकमेकांवर दगडाने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. या हाणामारीचा एक व्हिडिओ समोर आला असून तो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील नांदगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका किरकोळ कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. पोलीस ठाण्याबाहेर हाणामारी आरडाओरडा ऐकून पोलीसही बाहेर आले. यानंतर हा वाद एवढा विकोपाला गेला कि पोलिसांसमोरच दोन्ही गटांनी एकमेकांवर हल्ला केला. यानंतर पोलिसांनी आपल्या बळाचा वापर करून दोन्ही गटांना पांगवलं. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.

या तुंबळ हाणामारीत दोन महिला जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यानंतर दोन्ही गटांनी नांदगाव पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल केल्या असून या प्रकरणी पोलिसांनी काही आरोपींना ताब्यात घेतलं आहे. या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.