हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitishkumar) यांनी राज्यातील जनतेला खुश करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. बिहारमधील गरीब नागरिकांना प्रत्येकी 2 लाख रुपये देण्याची घोषणा नितीशकुमार यांनी केली आहे. मंगळवारी झालेल्या बिहार मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव आणण्यात आला, त्याला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली. त्यानुसार आता बिहार मधील 94 लाख 33 हजार 312 गरीब कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपये देण्यात येणार आहेत. या योजनेसाठी 1250 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. भाजपला शह देण्यासाठी नितीशकुमार यांनी हा मास्टरस्ट्रोक खेळला असल्याचे बोललं जात आहे.
बिहारच्या मंत्रिमंडळ विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. एस. सिद्धार्थ यांनी याबाबत माहिती देताना म्हंटल कि, बिहार लघु उद्योजक योजनेंतर्गत राज्य सरकार गरीब कुटुंबांना प्रत्येकी दोन लाख रुपये देणार आहे. राज्य सरकारने ही योजना राबविण्याची प्रक्रिया निश्चित केली आहे. ज्या उद्योगासाठी सरकार हे पैसे देणार आहे त्या 62 उद्योगांची यादीही सरकारने काढली आहे. यामध्ये लाकूड-आधारित उद्योग, अन्न प्रक्रिया, बांधकाम उद्योग, सलून, लॉन्ड्री, इलेक्ट्रॉनिक्स, हस्तकला, कापड, दैनंदिन वापराच्या गरजा यासारख्या सेवा क्षेत्रांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे.
कसे मिळणार पैसे –
बिहारमध्ये नुकत्याच पार पडलेल्या जातीनिहाय जनगणनेच्या आधारे ९४ लाख ३३ हजार ३१२ गरीब कुटुंबांची निवड करण्यात आली आहे. या सर्व कुटुंबाचे मासिक वेतन सहा हजार रुपयांपेक्षा कमी आहे. त्यामुळे पुढील पाच वर्षांत या कुटुंबांतील किमान एका सदस्याला रोजगारासाठी 2 लाख रुपयांचे अनुदान देण्याचे राज्य सरकारचे उद्दिष्ट आहे. या अनुदानाची रक्कम सरकार 3 हप्त्यांमध्ये देणार आहे. यातील पहिल्या हप्त्यात 25 %, दुसऱ्या हप्त्यात 50 % आणि तिसऱ्या हप्त्यात उर्वरित 25 % रक्कम मिळणार आहे. सरकारने या योजनेच्या अंमलबजावणीसाठी उद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव/ प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली एक समितीही स्थापन करण्यात आली आहे. सध्या लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे. त्यापार्श्वभूमीवर नितीशकुमार यांनी घेतलेला हा निर्णय मोठा मास्टरस्ट्रोक असल्याचे बोललं जात आहे.