सोलापूर प्रतिनिधी । जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील 700- 800 लोकवस्ती असणार वसंतराव नाईक नगर गाव आहे. या गावात 90-95 कुटुंबांचं वास्तव्य आहे. इथल्या सर्वच कुटुंबांचा शेळीपालन हाच मुख्य व्यवसाय आहे.अशात मागच्या आठवड्याभरात गावातील 20 शेळ्या जुलाब होऊन दगावल्या आहेत. मात्र अद्याप शेळ्यांना नेमका कोणता रोग झाला आहे याच निदान झालं नाही.
गरीबाची गाय म्हणून शेळीकडे पाहिलं जातं. मात्र वसंतराव नाईक नगरमध्ये या गरीब कुटुंबांचं उदरनिर्वाहाचं साधन असणाऱ्या शेळ्या मागच्या आठवड्याभरापासून दगावत आहेत. संपूर्ण गावामध्ये 300-350 शेळ्या आहेत. कोरोना व्हायरसच्या संकटामुळे सगळीकडे संचारबंदी आहे. त्यामुळे शेळ्यांना नेमका आजार कोणता झाला आहे याच निदान करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी ही गावात येऊ शकतं नाही.
शेळ्यांना मुख्यत्वे आंत्रविषार, धनुर्वात, फुफ्फुसदाह, हगवण, खुरी,फऱ्या,सांसर्गिक गर्भपात, स्तनदाह, घटसर्प हे आजार होतात. मात्र यातील लक्षण दगावणाऱ्या शेळ्यांमध्ये दिसत नाहीत. त्यामुळे दगावणाऱ्या शेळ्यांच्या रोगांचं निदान अद्याप झालं नाही. सर्वसाधारणपणे एक जिवंत मोठी शेळी 6000-7000 रुपयाला विकली जाते. मात्र या रोगामुळे याच शेळीची किंमत 2000-2500 झाली आहे. शेळ्या जगल्या पाहिजेत यासाठी ग्रामस्थ इंजेक्शनद्वारे शेळीच्या पिल्लाना दूध पाजत आहेत. वेळीच शेळ्यांवर उद्भवलेल्या या रोगावर नियंत्रण आणलं तर भविष्यात होणारा धोका टाळला जाऊ शकतो.